Chaupher News
जगभरात करोना विषाणूने हजारोंचा मृत्यू झाल्यानंतर आता भारतातही या विषाणूच्या संसर्गाचा पहिला बळी गेल्याचे वृत्त आहे. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात सुमारे ४००० मृत्यू झाले आहेत. भारतातही हा विषाणू दाखल झाला असून आजवर पन्नासच्यावर संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांवर विविध शहरांमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्हात एका ७६ वर्षीय करोना बाधित संशयीत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे. मात्र, अद्याप या संशयीताच्या मृत्यूचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर या व्यक्तीला करोना झाला होता किंवा नाही हे स्पष्ट होईल.
करोनामुळं इटलीमध्ये शेकडो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. हे विद्यार्थी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील आहेत. इटलीतील मिलन, पोडोवा आणि रिमिनी या शहरांमध्ये हे विद्यार्थी शिकत आहेत. हे सर्व भाग करोना विषाणूंच्या संसर्गाबाबत रेड झोन जाहीर झाले आहेत. इटलीमध्ये ९ मार्चपर्यंत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. मिलानवरुन एक विमान इटलीतून प्रवाशांची स्क्रिनिंग (तपासणी) न करताच दिल्ली विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर या विमानातून प्रवास करणाऱ्या ८० लोकांची दिल्लीच्या विमानतळावर स्क्रिनिंग झाली.
मुंबईत आढळले कोरोनाचे दोन रुग्ण, राज्यातील आकडा ७ वर
राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या दोघांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या असून राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा ७ वर पोहचला आहे.राज्यात दुबईहून परतलेल्या पुण्यातील कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कुटुंबियांच्या विमानातून मुंबईत आढळलेल्या रुग्णांनी प्रवास केला होता. या रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
‘त्या” करोना बाधिताच्या कुटुंबावर सोलापुरातील गावानं टाकला बहिष्कार
जगभरात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरसने भारतामध्ये शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारतात करोनाचे ६० रूग्ण आढळले आहेत. करोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुण्यातही करोनाचे पाच रूग्ण आढळले आहेत. पुण्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या पाच रूग्णांपैकी एका रूग्णाच्या घरावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या सोलापूरमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा’, असे म्हणत त्या व्यक्तीच्या घरावर गावकर्यांनी बहिष्कार टाकला आहे.त्या वक्तीच्या घरच्यांना सतत गाव सोडून जाण्यासाठी तगादा लावला जात आहे. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा,’ असा मानसिक त्रास दिला जात असल्याचे करोना बाधित रुग्णाच्या भावाने सांगितले.