Chaupher News

भाजपकडून राज्यसभेसाठी आरपीआयचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व माजी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. त्याप्रमाणे नुकताच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले पण तिसर्‍या जागेचा पेच कायम होता. या उमेदवारीच्या शर्यतीत पुण्याचे संजय काकडे व विद्यमान खासदार अमर साबळेही होते. मात्र, भाजपने औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देऊन या दोघांचाही पत्ता कट केला आहे.
भाजच्या विधानसभा सदस्यांच्या संख्याबळानुसार राज्यसभेवर तीन उमेदवार निवडून जाऊ शकतात. त्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले व संजय काकडे इच्छुक होते. उदयनराजे यांचे नाव निश्‍चित मानले जात असताना संजय काकडे यांनी आपल्याचाच उमेदवारी मिळणार असे जाहीर करून उदयनराजे यांना आव्हान दिले होत. मात्र त्यांचा पत्ता कट झाल्याने आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची राज्यात सत्ता आली. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभा खासदार मुरली देवरा यांचे 2015 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनपेक्षितपणे अमर साबळे यांनी उमेदवारी मिळाली होती. विधानसभेत भाजपचे बहुमत असल्याने 11 मार्च 2015 रोजी साबळे राज्यसभेत बिनविरोध निवडून गेले होते.
दरम्यान, 2014 मध्ये राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने शहरात तीन राज्यमंत्रीपद, राज्यसभा खासदारकी दिली. परंतु, 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकासआघाडीचे सरकार आले. त्याचा परिणाम शहर भाजपवर झाला.
2014 मध्ये संजय काकडे हे राज्यसभेचे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यात काकडे यांचा मोठा वाटा आहे. 98 नगरसेवक येणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तविले होते. आणि नेमके तेवढेच नगरसेवक निवडून आल्याने भल्याभल्यांना धक्का बसला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवार निवडून आणण्यासाठी काकडे यांनी जोरदार प्रयत्न केले. तरीही काकडे यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे महापालिकेत काकडे यांना मानणारे तब्बल 30 ते 35 नगरसेवक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काकडे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. ते काय बोलणार, याची उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here