चौफेर न्यूज – कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम-30′ गोळ्या मोफत देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले आहे.

मानवी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम-30 चे औषध घ्यावे, असे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे म्हणणे आहे. केरळ सरकारने 45 लाख घरांमध्ये समचिकित्सा वैद्यक पद्धतीनुसार या गोळ्यांचे वाटप केले त्यामुळे तेथे कोरोनाचे मृत्यू झालेले नाही तसेच कोराणाच्‍या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली नाही. पंजाब आणि गोवा राज्यांनीही या औषधाचा वापर केलेला आहे, याकडे सुतार यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

आयुष मंत्रालयाच्या शिफारसी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनेही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अर्सेनिक अल्बम – 30 गोळ्या वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे महापालिकेनेही राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचा सल्ला घेऊन अर्सेनिक अल्बम – 30 गोळ्या कोरोना रुग्णांना मोफत वाटप कराव्यात यासाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक मंडळे, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांची मदत घ्यावी, असे पृथ्वीराज सुतार यांनी निवेदनात म्हटले आहे.

कमी खर्चात प्रभावी योजना राबवून कोरोनावर नियंत्रण ठेवू, असा विश्वासही पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केला आहे. पुणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे, डॉक्टरांचे 1 टास्क फोर्स सल्लागार समिती म्हणून स्थापन करण्यात यावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सोबत केंद्र आणि राज्य सरकार यांनी वेळोवेळी केलेल्या आदेशाची व माहितीची प्रत जोडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here