चौफेर न्यूज – इंजिनिअरींग, फार्मसी, बी.एस्सी (ऍग्री) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्टेट सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षा घेतली जात असते. एप्रिल महिन्यात ही परीक्षा होणार होती. परंतु कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे परीक्षेला स्थगिती दिली होती. सीईटी सेलने या परीक्षेचे वेळापत्रक जारी केले असून तब्बल पंधरा दिवस ही परीक्षा सत्रनिहाय घेतली जाणार आहे.

फिजिक्‍स, केमिस्ट्री, मॅथ्स (पीसीएम) आणि फिजिक्‍स, केमिस्ट्री, बायोलॉजी (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये स्वतंत्ररित्या ही परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या परीक्षेच्या तारखा जाहिर केलेल्या असल्या तरी ग्रुपनिहाय वेळापत्रक जूनच्या मध्यावधीत जाहिर केले जाणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्राचा तपशील याच वेळी जाहिर केला जाईल. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात संगणकावर (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) घेतली जाणार आहे. सीईटी सेलतर्फे जारी केलेल्या सूचनेत एमएचटी-सीईटी 2020 ही परीक्षा 4 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात महिन्याभराचा कालावधी दिसत असला तरी सुट्यांचा विचार करता ही परीक्षा या कालावधीत पंधरा दिवस पार पडेल. 4 जुलै, 6 ते 10 जुलै, 13 व 14 जुलै दरम्यान परीक्षा झाल्यानंतर 28 ते 31 जुलै व अंतीम टप्यात 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

गेल्या वर्षी पीसीएमबी असा एकत्रित ग्रुप घेण्यात आल्याने पर्सेंटाईलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. परंतु यंदा हा गोंधळ टाळण्यासाठी पीसीबी, पीसीएम असे दोन स्वतंत्र ग्रुप घेतल्याने गोंधळ टळणार आहे. दरम्यान परीक्षा घेतांना सोशल डिस्टंसिंगसह अन्य निकष पाळणे आवश्‍यक असल्याने परीक्षा कालावधी वाढविण्यात आला आहे. तर परीक्षा केंद्रांची संख्यादेखील वाढविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here