चौफेर न्यूज – गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले पिंपरी-चिंचवड शहर खुले करण्यात आले आहे. शहरातील बाजारपेठा आज (शुक्रवार) पासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची वर्दळ वाढली. शहरातील विविध भागातील दुकाने उघडल्याने खरेदीसाठी नागरिकांची ये-जा पहायला मिळाली. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टनसिग्नचे उल्लंघन झाले. तर, काही ठिकाणी नागरिक सुरक्षित वावर ठेऊन खरेदी करत असल्याचे पहायला मिळाले.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार शहरातील बाजारपेठातील दुकाने आजपासून उघडण्यास, उद्योगही पुर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ठेवली आहे. दुकाने सुरु करण्यासाठी परवानगीची कोणतीही अट नाही. तसेच प्रतबंधित क्षेत्र वगळून 26 मे पासून पीएमपीएलच्या 50 टक्के क्षमतेने बस सुरु होणार आहेत.

लॉकडाउन झाल्यापासून मेडीकल आणि किराणा दुकाने वगळाता शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती.भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांवरही अनेक बंधने घालण्यात आली होती. मात्र, आता शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले आहे. कन्टेंमेंट झोनसह इतर ठिकाणी अटींसह दुकाने सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.

त्यामुळे शुक्रवारी सकाळी शहरातील विविध भागांमध्ये रहदारी पहायला मिळाली. तब्बल दोन महिन्यांनंतर नागरिकांनीही घराबाहेर पडत विविध वस्तूंची खरेदी करण्याचा आनंद घेतला.

ही दुकाने सुरु झाली असली तरी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच ही दुकाने सुरु राहणार आहेत. तसेच दुकानांसमोर गर्दी न होऊ द्यायची जबाबदारी संबंधित दुकानदारांची राहणार आहे. त्यामुळे दुकानदारही विशेष काळजी घेत असल्याचे पहायला मिळाले.

या भागातील दुकाने पी 1- पी 2 या तत्वानुसार सुरु राहतील!

चिंचवड स्टेशन, पिंपरी कॅम्प, साई, शगुन चौक, गांधीपेठ, चापेकर चौक, काळेवाडी मेन रोड, अजमेरा पिंपरी, मोशी चौक, मोशी आळंदी रोड, निगडी बस स्टॉप, डांगे चौक ते काळेवाडी फाटा, भोसरी आळंदी रोड, कावेरीनगर मार्केट, कस्तुरी मार्केट, थरमॅक्स चौक ते साने चौक, दिघी जकात नाका ते मॅग्झीन चौक, साईबाबा मंदिर या विर्निदिष्ठ बाजारपेठ मधील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरु राहतील.

त्यासाठी पी1- पी 2 या तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील. तर, दुस-या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी पुर्वपरवानगीची आवश्यकता राहणार नाही. पुढील आदेशापर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here