Vector of a boy using a computer surrounded by education icons and symbols.

चौफेर न्यूज – १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि मुख्यत: डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न असेल, असे शिक्षण आयुक्तांनी सांगितले आहे. मात्र, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिथे पाडे, वस्त्या आहेत अशा भागातील विद्यार्थ्यांना मोबाइल, टीव्हीद्वारे डिजिटली शिक्षण मिळणे कठीण आहे. परंतु, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शक्य ते पर्याय वापरून शिकवण्याचा प्रयत्न करू, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. १५ जूनला शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाही तरी बहुतांश ठिकाणी त्या आनलाइन भरतील किंवा जिथे शक्य नाही तिथे मोबाइल, टीव्हीच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले आहे. ठाणे-मुंबई हा परिसर रेड झोनमध्ये असल्याने येथे डिजिटल शिक्षणाचा अवलंब होऊ शकतो. मात्र, मुरबाड, शहापूर तालुके आणि भिवंडी, कल्याणचा काही भाग ग्रामीण भागात समाविष्ट आहे. या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा घरांतील पालकांकडे अॅण्ड्राइड फोन नाहीत. अनेक घरांमध्ये टीव्हीसुद्धा नाही. फोन असलेच तर त्यात रिचार्ज करण्याइतके पैसे नाही आणि जरी रिचार्ज केले तरी अनेक भागात नेटवर्क चांगले मिळत नाही, या एकूणच परिस्थितीमुळे मोबाइलद्वारे आनलाइन शिक्षण घेणं येथील अनेक विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही, असे मत काही शिक्षकांनी मांडले. तर, आमची दोन किंवा तीन मुले एकाच शाळेत वेगवेगळ्या इयत्तेत शिकत आहेत. त्या प्रत्येकाच्या ठरावीक वेळात अभ्यासासाठी मोबाइल, नेट उपलब्ध करून देणं, हे शक्य होणार नाही, असे काही पालकांनी सांगितले. यंदा आनलाइन शिक्षणावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८० टक्के पालकांकडे अॅण्ड्राइड फोन आहेत. तर, ५० टक्के विद्यार्थ्यांच्या घरांत टीव्ही आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाइल नसतील किंवा इतर काही अडचणी असतील, त्यांच्यासाठी टीव्हीद्वारे अभ्यासाचे पाठ दिले जाणार आहेत. ज्यांच्या घरात टीव्हीही नाही, अशांसाठी रेडिओद्वारेही पाठ देण्याचा प्रयत्न करू. अर्थात, सरकारच्या आदेशानुसारच आम्ही पुढील सर्व निर्णय घेणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here