चौफेर न्यूज – मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षणामुळेच त्यांचा विकास होणार आहे. मात्र, त्याबरोबरच मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी वाटते. शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच १५ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची गरज असल्याचा सूर शहरातील पालकांसह संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी काढला. राज्य शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करता येतील का, याविषयी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शाळांमध्ये नियम पाळले जातील का, असा प्रश्न यावेळी सर्वांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी शाळांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत का, विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, अॅटोरिक्षांमध्ये विद्यार्थी दाटीवाटीने बसविले जातात. शाळा सुरू झाल्यास या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे काय होणार, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. या सर्व अडचणींमुळे अनेदक पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविण्याचीच भूमिका घेतली आहे. घरी बसून त्यांचा अभ्यास घेता येईल. मात्र, त्यास शाळेत पाठवून जीव धोक्यात घालण्यास आम्ही तयार नाहीत, असेही काही पालकांनी सांगितले.