चौफेर न्यूज – अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या विषयाला सध्या राजकीय रंग चढला असून परीक्षा होणार किंवा नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यावर आपली एकत्रित भूमिका स्पष्ट करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत ,याबाबत शैक्षणिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या हालचालीमुळे या विषयाला राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे.परंतु, यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, प्राचार्य महासंघ, एम.फुक्टो (प्राध्यापक संघटना) व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अराजकीय संघटनांनी यावर एकत्रितपणे भूमिका मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून जाहीर केल्या जात असलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र, परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा निकाल जाहीरकरण्याचे काम प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केले जाते. या घटकांना विश्वासात घेतल्याशिवाय परीक्षा घेण्याची व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.मात्र, विविध राजकीय पक्षांकडून परीक्षांबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षेवर जाहीर केलेल्या निर्णयानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल,असे राज्य शासनाला नुकतेच कळविले. त्यामुळे अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here