चौफेर न्यूज – कोरोणाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे मुंबई जिल्हा अद्यापही रेड झोनमध्येच असल्यामुळे महापालिका शाळेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना महानगर पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची घोषणा झाली असली तरी शाळा कधी सुरु होणार याबाबत कोणतेही निश्चित तारीख नाही. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी योग्यवेळी योग्य परिस्थिती पाहून घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत. पालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिक्षण सुरु आहे. त्यामुळे स्थानिक वाहतूक , शिक्षकांची सुरक्षा या साऱ्या बाबी लक्षात घेऊन ३० जूनपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत.

मुंबईतील सध्याच्या स्थिती पाहता ८३३ कन्टेन्टमेन्ट झोन आहेत त्यामुळे १५ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळा सुरू होणे शक्य नाही. तसेच मुंबईत रेल्वे सेवा सुरु असली तरी त्यात शिक्षकांना प्रवेश नसल्याने वसई, विरार, पालघर, बदलापूर, ठाणे अशा ठिकाणांहून येणाऱ्या शिक्षकांचे हाल होत आहेत.अनेक शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्याने तेथील शिक्षकांना शाळांच्या बाहेर उभे राहावे लागत होते. अनेक शिक्षक गावी आहेत मात्र वेतन कपातीच्या भीतीने ते खासगी वाहने करून मुंबईत परतावे लागत आहेत, अशा अनेक समस्यामुळे शाळा सुरु नसताना शिक्षकांना वर्क फ्रॉम होमच करू द्यावे अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे, भाजप शिक्षक आघाडी , मुख्याध्यापक संघटना, शिक्षक भारती यांनी वारंवार केली होती. या पार्श्वभूमीवर पुढील ३० जूनपर्यंत शिक्षकांनी शाळेत न येता घरूनच काम करण्याची परवानगीचे निर्देश शिक्षणाधिकारी पालकर यांनी जारी केले आहेत.

तसेच यासोबतच विद्यार्थ्यचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेमध्ये प्राप्त पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना देण्यासाठी टप्याटप्याने बोलवायचे आहे. त्‍यासाठी गरजेप्रमाणे शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे निर्देशांत म्हटले आहे. तसेच ज्यांना नवीन पाठयपुस्तके मिळणार नाहीत त्यांच्यासाठी सध्या मागील वर्षीची पाठयपुस्तके संकलित करून द्यायला सांगितली आहेत. इ लर्निंग सुविधेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरातून व्हाट्सअप, झूम, टेलिग्राम , विटर किंवा ऑफलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे असे सांगण्यात आले आहे.

रेड झोनमधील शाळांबाबत मार्गदर्शक सूचना अद्याप नाहीच १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होता असून जिल्ह्यांच्या स्थानिक स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेऊन शाळा जुलैपासून कशा पद्धतीने सुरु कराव्यात यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सोबतच रेड झोनमधील शाळांसाठी वेगळी मार्गदर्शक सूचना विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिली. त्याप्रमाणे त्या शाळांतील शिक्षकांची उपस्थिती ही ठरविली जाणार होती. मात्र अद्याप ते जारी न केल्याने रेड झोनमधील शाळांत शिक्षकांनी कोणत्या निकषांच्या आधारे उपस्थित रहावे आसपास संभ्रम शिक्षकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here