महापौर माई उर्फ उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे उद्यापासुन एक लाख ॲन्टिजेन किट उपलब्ध होणार आहेत. कोरोनाची लक्षणे असणारे तसेच कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅबद्वारे चाचणी होते. परंतु आता या किटचा वापर करुन अशा व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन किटच्या सहाय्याने प्रथम चाचणी करण्यात येणार आहे. अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात या संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे कि नाही याची माहिती मिळणार असून कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या ॲन्टिजेन किट मुळे स्वॅबद्वारे होणारी चाचणी त्यासाठी लागणारा वेळ, येणारा खर्च वाचणार असुन कोरोना प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. प्रामुख्याने या किटचा वापर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या को-मॉरबिड व्यक्ती, गरोदर महिला, फ्रंटलाईन कर्मचारी व कन्टेनमेंट झोनमधील व्यक्ती यांचेसाठी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास स्वॅब टेस्टींग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळालेली असुन उद्यापासुन या ठिकाणी स्वॅब टेस्टींग सुरु होणार आहे. यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती महापौर माई उर्फ उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here