चौफेर न्यूज – कोरोनामुळे नववीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वर्षभरातील आधी झालेल्या परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार करण्यात आले. नववीत अनुत्तीर्ण झालेल्या राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होण्याची चिन्हे नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या प्रवेशाबाबत संभृमनिर्माण झाला आहे. एकिकडे दहावीच्या वर्गासाठी अध्यापन सुरू झालेले असताना या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेची संधी नाकारून दहावीच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही.

शाळेचा दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण करून दहावीची परीक्षा बाहेरून देण्यास शाळा भाग पाडत असल्याच्या तक्रारी गेली काही वर्षे पालक करत आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी नववीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश शासनाने दिले. यंदा सरासरी मूल्यांकनानुसार देण्यात आलेल्या गुणांवरही पालक आणि विद्यार्थी नाराज आहेत. शाळांनी जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केल्याचा आक्षेपही पालक घेत आहेत.

मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होण्याची चिन्हे कमी आहेत. दहावीच्या वर्गासाठी अध्यापन सुरू झाले आहे. मुळातच वर्ष उशीरा सुरू झाले आहे. नववीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधीही न देता दहावीच्या वर्गात शाळा प्रवेश नाकारत आहेत. दरम्यान अपंग, अध्ययन अक्षम किंवा काही विषयांमध्ये, लिखाणात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात बसू न देण्याकडे शाळांचा कल असतो. लेखी परीक्षेच्या सरासरीनुसार करण्यात आलेल्या मूल्यांकनामुळे या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांनाही फेरपरीक्षेची संधी न मिळाल्यामुळे त्यांना पुढील वर्गातील शिक्षणाची संधीच नाकारली जात आहे. त्याचप्रमाणे वर्षांतील दोन चाचणी आणि सहामाही परीक्षा, तोंडी परीक्षा शाळा घेतात. या कालावधीत एखाद्या परीक्षेसाठी कौटुंबिक अडचणी किंवा आजारपण यांमुळे विद्यार्थी उपस्थित राहू शकत नाहीत. मात्र, सरासरी मूल्यांकनात अनुपस्थित राहिलेल्या विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळावी किंवा त्यांना सरसकट उत्तीर्ण करून शाळांनी दहावीच्या वर्गात प्रवेश द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here