चौफेर न्यूज – पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील 32 अतिप्रगत शाळांच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करुन घेतले होते. या सर्व शाळांमधील उल्लेखनीय उपक्रमांचा, डाएट, एनसीआरटी, बालभारती व शिक्षण विभागाच्या शिक्षण तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे सभापती रणजीत शिवतरे यांनी दिली. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम भोर तालुक्‍यातून केली जाणार आहे.

भविष्यवेधी शिक्षण या विषयावर भोर तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांसाठी तीन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन 27 जुलै ते 29 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ‘गुगल मीट’ या ऍपवर घेतले जाणार असल्याचे रणजीत शिवतरे यांनी म्हटले आहे. शिक्षण विकसन प्रक्रिया व वाबळेवाडी (ता. बारामती) या शाळेच्या धर्तीवर शाळा व शिक्षण या विषयांवर आधारित हे प्रशिक्षण असणार आहे.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, भोर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, डायटचे नीलेश घुगे, वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे, त्यांची टीम या ऑनलाइन कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिक्षण प्रक्रिया विकसित करण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण ऑनलाइन ही कार्यशाळा, शाळा विकसनासाठी उपयुक्त ठरणार असून हे ऑनलाइन प्रशिक्षण प्रत्येक शाळेसाठी व शाळेतील प्रत्येक शिक्षकांसाठी दीपस्तंभ ठरणार असून, शिक्षकांनी या ऑनलाइन कार्यशाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण व आदर्श शाळा निर्माण कराव्यात, असे आवाहन शिवतरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here