पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी राज्य व केंद्र सरकारने ‘मेट्रो रेल्वे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प पूर्वनियोजित निर्णयाप्रमाणे निगडी ते स्वारगेट असा पूर्ण करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 मार्च 2015 रोजी मेट्रो फेज-1 निगडीपासून सुरू करावी, अशी मंजुरी दिली होती. मात्र, आता केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) निगडी ऐवजी पिंपरी ते स्वारगेट अशी मंजुरी दिली आहे. वास्तविक, पिंपरी ऐवजी निगडी येथून प्रकल्पाला सुरुवात केल्यास नियोजित खर्चामध्ये बचतही करता येईल. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या दृष्टीने निगडी ते स्वारगेट हा मार्ग सोयीचा आहे. मेट्रोच्या नियोजित आराखड्याप्रमाणे स्वारगेट ते पिंपरी आणि त्यानंतर निगडी- पिंपरी विस्तार हे मेट्रोच्या दुसर्या टप्प्यात होणार आहे. मात्र, मेट्रोचा पहिला टप्पा करण्यासच पाच ते सात वर्षे लागणार आहेत.