चौफेर न्यूज – बारावीच्या विद्यार्थ्याना भूगोलाच्या अभ्यासादरम्यान जे सर्वेक्षण करावे लागते ते आता यंदापासून एका क्लिकवर करणं शक्य होणार आहे. भूगोलाच्या 12 वीच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि आवश्यक गरजा लक्षात घेता बालभारतीनं या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे.
आतापर्यंत 1555 विद्यार्थी तर 567 शिक्षकांनी या अॅपसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे बालभारती मंडळाकडं आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून 1099 सर्वेक्षणाची नोंद झाली आहे. यंदा बारावीला मानवी भूगोल असल्यानं अभ्यासक्रमात सर्वेक्षण गरजेचे आहे. जे विद्यार्थी अभ्यासक्रमात शिकत आहे त्याची समाजात जाऊन चाचपणी सर्वेक्षणाद्वारे करायची आणि जी सांख्यिकी माहिती जमा होईल त्याचा वापर करून विश्लेषण करायचे ही कार्यपद्धती सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असते. आधी हे सर्वेक्षण घरोघरी जाऊन पेन आणि वहीच्या साहाय्यानं केलं जात होतं. आता त्यासाठी मोबााईल अॅपचा वापर होईल.
बालभारतीचे भूगोल विषयाचे विशेषाधिकारी रवी जाधव यांनी सांगितलं की, बालभारती संचालकांची या अॅपला मान्यता मिळाली आहे. भूगोलाच्या शिक्षकांना या अॅपच्या लिंक पाठवल्या आहेत. या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. ई बालभारतीच्या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे.
अॅपमध्ये जिओ टीचर हे शिक्षकांसाठी तर दुसरे जिओ सर्वेक्षण हे विद्यार्थ्यांसाठी असे दोन प्रकारचे अॅप बनवले आहेत. शिक्षकांनी शाळेचा यु डायस नंबर आणि स्वत:चा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यांना जो कोड मिळेल त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. हा कोड विद्यार्थी त्यांच्या मोबाईल अॅपमध्ये टाकतील. यामुळं शिक्षक विद्यार्थ्यांशी आपोआप कनेक्ट होतील. यामुळं विद्यार्थी कुठले सर्वेक्षण करीत आहेत, किती बाकी आहे याची इत्थंभूत माहिती शिक्षकांना मिळेल. यामुळं मूल्यांकन करणंही सोपं जाणार आहे.