चौफेर न्यूज – अंतिम वर्ष परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीस प्राधान्य राहील. तसेच पहिल्या टप्प्यात काही विषयात अनुत्तीर्ण राहिलेल्या बॅकलॉक विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असल्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला.
राज्य शासनाने सर्व विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक झाली. यात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यात राज्य शासनाने 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व परीक्षा व निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, बैठकीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षेत सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल, लॅपटॉप अशी साधने नाहीत किंवा इंटरनेटची व्यवस्था नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक पुढील चार ते पाच दिवसांमध्ये जाहीर केले जातील, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.