चौफेर न्यूज –  कोरोनामुळे विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काम करणारे शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या नोकरीवर गदा आली आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विनाअनुदानित शाळांनी या कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा बंदचा फटका विषय आणि कला शिक्षकांनाही बसला असून बहुतांश शाळांनी एप्रिल महिन्यापासून शिक्षकांना वेतन दिलेले नाही, तर काही शाळांनी शिक्षकांना कामावरून कमी केले आहे.

या सर्व शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱया शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा जगण्याचा संघर्ष लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतरही कायम राहिला आहे. अनेक शाळांनी केवळ ऑनलाइन वर्ग सुरू असल्यामुळे शिक्षकांना अवघे 50 ते 25 टक्के वेतनच देऊ केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱया अनेक शिक्षकांना पुन्हा व्याख्यान घेण्यासाठी न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गणित विषय शिकवण्यासाठी दोन शिक्षक असतील तर आता एकच शिक्षक ठेवण्यात आला आहे. याच शिक्षकाकडून सर्व वर्गांचे ऑनलाइन शिक्षण करून घेतले जात आहे. यामुळे एका शिक्षकाला एक वर्षासाठी कामावर येऊ नये असे सांगण्यात आले आहे. काही शाळांमध्ये क्रीडा व कला शिक्षकांची नियुक्ती केली होती. या शिक्षकांनाही घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

तासिका तत्त्वावर काम करणाऱया नेट-सेटधारक शिक्षकांचे मानधन बंद करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी या शिक्षकांची सेवाच थांबविण्यात आली आहे. सरकारने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असल्याचे मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here