चौफेर न्यूज –  मार्चमध्ये देशात कोरोनाचा कहर वाढू लागल्याने टाळेबंदी करण्यात आली होती. याकाळातमहाविद्यालये देखील बंद असल्याने शैक्षणिक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने हे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले होते मात्र अनेक सोयीसुविधांअभावी विद्यार्थ्यांना त्यास मुकावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

९ वी ते १२ वी या वर्गांच्या शाळा सुरु झाल्यानंतर उच्च शिक्षणाशी व विद्यापीठांशी निगडित महाविद्यालये देखील सुरु करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या. युजीसी म्हणजेच विद्यापिठ अनुदान आयोगाने महाविद्यालये सुरु करण्याबाबतच्या नियमावली जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालये नेमक्या कधी सुरु होणार याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली होती.

आज म्हणजेच 20 जानेवारीपर्यंत 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही याबाबत कोणतीच घोषणा व हालचाली सुरु नसल्याने भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

’20 जानेवारीपासून राज्यातील महाविद्यालय चालू करण्याची घोषणा उदय सामंत यांनी केली होती. मात्र ती घोषणा हवेत का जिरली? कळलं नसलं तरी सरकारी पातळीवर महाविद्यालय चालू करण्याबाबत कुठल्याही हालचाली चालू नाहित. याचा अर्थ शिक्षण खातं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कुठलाही समन्वय नसून सरकार केवळ घोषणा करतं. आता महाविद्यालय चालू कधी होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागल आहे. मात्र फेसबुक वर मंत्री सामंत यांनी केलेल्या घोषणेचं काय?’ असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here