चौफेर न्यूज – विद्यापीठांतर्फे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय राहील. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी दोन्ही पर्याय असतील, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. दरम्यान, यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम सत्राची परीक्षा फक्‍त ऑनलाइनद्वारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऑनलाइनसह ऑफलाइनचाही पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे उपकेंद्र पुणे, नांदेड, औरंगाबाद आणि रत्नागिरी येथे स्थापन केले जाणार आहे. पुण्यात बालेवाडी येथे हे उपकेंद्र होणार असून, त्यासाठी 10 कोटी रुपये खर्च येणार आहे.

तसेच कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विश्‍वविद्यालयाचे उपकेंद्रही पुणे, रत्नागिरी, नाशिक आणि औरंगाबाद येथे स्थापन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाचे दोहा कतार येथे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्‍यक करारास मान्यता दिली आहे. तसेच व्हीआयटी महाविद्यायातील नियमबाह्य प्रवेशाचे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

प्राध्यापक भरतीचा निर्णय अद्याप अंधातरीच

गेल्या महिन्यात 260 प्राचार्य पदांना मंजुरी देण्यात आली. ही संख्या 2017 अखेरपर्यंत आहे. त्यानंतर तीन वर्षांत प्राचार्य पदाच्या रिक् संख्येत वाढ होणार आहे. आणखी 250 प्राचार्य पदांना मंजुरी दिली जाणार आहे. प्राध्यापक भरतीसंदर्भात सद्य:स्थितीत किती पदे रिक् आहेत, त्याचा आढावा घेण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले आहेत. प्राध्यापक भरतीचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सावित्रीबाई फुले स्मारक

सावित्रीबाई फुले यांचे स्मारक पुणे विद्यापीठात उभारण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भुजबळ यांच्याशी चर्चा झाली आहे. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी विद्यापीठाने तसा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाला दिल्या आहेत. हा प्रस्ताव आल्यांनतर त्याचा लवकरच निर्णय घेतले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

करोना संसर्ग वाढल्यास निर्णय घ्यावे लागतील

स्थानिक परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू झाली. हा निर्णय घेताना करोनाची स्थिती नियंत्रणात होती. मात्र, संबंधीत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात करोना रुग्णांची संख्या वाढली तरी त्याबाबत संबंधीत विद्यापीठाचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा. रुग्ण संख्या वाढत राहिल्यास, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागतील, असेही उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here