चौफेर न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी दि. 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा होत आहे. यासाठी प्रवेशपत्र (हॉलतिकीट) प्राप्त झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्र मिळाल्याची उमेदवारांची तक्रार आहे. तसेच, दोन पदांसाठी स्वतंत्ररित्या अर्ज केल्यानंतर त्याची परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळेस घेण्यात येत आहे. त्यामुळे काही उमदेवारांना एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.

सुमारे तीन हजार पदांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यासाठी महापरीक्षा पोर्टलवरून उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले. त्यात ज्या परीक्षार्थींनी पुणे, सातारा, सांगली ही केंद्र निवडली होती, त्यांना विदर्भ, मराठवाड्यातील केंद्र देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अकोला, वाशिम, नागपूर ही केंद्र निवडली होती, त्यांना सातारा, सांगली, कोल्हापूर हे केंद्र दिली आहेत. त्यावरून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सद्य:स्थितीत करोनाचे संकट आणखी वाढले आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना त्यांनी निवडलेले केंद्र देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दूरचा प्रवास करून परीक्षा देणे उमेदवारांना चिंतेची बाब बनली आहे. यातून महापरीक्षा पोर्टलने त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.

आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी ही भरती होत आहे. वरिष्ठ लिपिक व सांख्यिकीय अन्वेषण या दोन पदांसाठी स्वतंत्र अर्ज केला आहे. त्यासाठी पुणे हे केंद्र निवडले होते. मात्र, एक परीक्षा पुणे, तर दुसरी परीक्षा नाशिक येथे केंद्र देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पदासाठी परीक्षा एकाच दिवशी व त्याचवेळेत होत आहे. ही बाब अन्यायकारक आहे, असे परीक्षार्थी ज्ञानेश्‍वर विळेकर म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here