चौफेर न्यूज – वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (नीट) तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे संकेत राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक विनीत जैन यांनी दिले. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवडयात ‘नीट’ परीक्षांची घोषणा होईल असे त्यांनी सांगितले. नीट’ परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नसल्याबद्दल जैन यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर 28 शिक्षण मंडळे, दोन मंत्रालये आणि एनटीए यांना ‘नीट’ परीक्षेबाबत निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया मोठी असते असे जैन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवर या परीक्षेचा बराच ताण असतो. त्यामुळे वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी असे पत्र एनटीएने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहे.