चौफेर न्यूज – एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. यात 0 ते 18 या वयोगाटातील जवळपास 10 लाख 24 हजार 280 विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणामध्ये 4 हजार 279 जण शाळाबाह्य आढळून आले. त्यामध्ये 3 ते 6 वयोगटातील 2 हजार 50, तर 6 ते 11 या वयोगाटातील 914 शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राज्यात बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 लागू केला आहे. त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्‍क प्राप्त झाला आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचण यासह विविध कारणांमुळे मुले-मुली शाळेत जात नाही. प्राथमिक शिक्षण घेतल्यावर माध्यमिक शिक्षण निम्म्यावरच सोडले जाते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार 22 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2021 दरम्यान 8 लाख 87 हजार 163 कुंटुंबातील तब्बल 10 लाख 24 हजार 280 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले.

ग्रामीणमध्ये ऊसतोडणी, शेती, रस्ते, बांधकाम, दगडखाण याठिकाणी कामासाठी आलेल्या मुलांचेही पुन्हा सर्वेक्षण करून यातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी प्रयत्न करावा. त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रासह नगरपालिका, नगरपरिषद याठिकाणी असणारे रेड अलर्ट झोन, ऊसतोडणी कामगार, साखर उद्योग, गुऱ्हाळे, छोटे-मोठे उद्योग, कारखाने, स्थलांतरीत होणारे कुटुंब, बालकामगार, वीटभट्टी, कोळसा खाणी, शेतमजूर, सार्वजनिक बांधकाम याठिकाणी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 3 ते 6 वयोगाटातील 2 हजार 50 विद्यार्थी शाळाबाह्य आहे. 6 ते 11 वयोगटातील 914, 11 ते 14 वयोगटातील 472, तर 14 ते 18 वयोगटातील 456 शाळाबाह्य विद्यार्थी असल्याचे समोर आले. त्याचबरोबर शाळाबाह्य दिव्यांग बालकांमध्ये 387 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here