चौफेर न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोना (COVID-19) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये येत्या 14 मार्चनंतरही ठेवण्यात येणार आहेत. 10 आणि 12 वी परीक्षा घेण्याबाबत तयारी करावी लागणार आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध लावण्याबाबत शुक्रवारी (दि. 12) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत शक्रवारी विधान भवन येथे कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सलटंसी सर्व्हीसेस (टीसीएस) या संस्थांकडून पाहणी अहवाल सादर करण्यात आला. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत शास्त्रोक्त विश्लेषण करण्यात आलं.

शाळामहाविद्यालये 14 मार्चनंतरही बंदच, 10 वी 12 वीच्या परीक्षा घेणार
याबाबत बोलताना सौरभ राव म्हणाले, सध्या शाळा-महाविद्यालये 14 मार्चपर्यंत बंदच आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे शाळा महाविद्यालये प्रमुख कारण आहे. त्यामुळं आयसर आणि टीसीएस या संस्थांनी शाळा-महाविद्यालये 14 मार्चनंतरही बंदच ठेवावीत अशी स्पष्ट शिफारस केली आहे. शाळा-महाविद्यलाये बंद ठेवल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना फारसा त्रास होणार नाही परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत प्रशासनाची तयारी आहे.

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय होईल
सौरभ राव असंही म्हणाले, हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार बंद करून केवळ पार्सल सेवा सुरू ठेवणं, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं, चित्रपटगृह, मॉल, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री बंद ठेवणं या पर्यायांची अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या किती घटणार आहे याचं विश्लेषण या अहवालात केलं आहे. त्यावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बैठकीत काय ठरलं ?
– शाळा-महाविद्यालये 14 मार्चनंतरही बंदच
– दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत प्रशासनाची तयारी
– आयसर आणि टीसीएस या संस्थांनी सादर केला पाहणी अहवाल
– उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार अंतिम निर्णय

अभ्यास करून नियोजन
सौरभ राव यांनी सांगितलं की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येची नोंद गुरुवारी झाली. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात रोज 1800 ते 2000 रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयु बेड्स, व्हेंटीलेटरची गरज, बाधित रुग्णांचे मृत्यू या बाबींचं विश्लेषण करण्यात येणार आहे. त्याची तुलना सध्याच्या परिस्थितीसोबत करण्यास आयसर आणि टीसीएस यांना सांगण्यात आलं आहे. त्याचा अहवाल हा 10 मार्च रोजी प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर ठोस नियोजन करणं शक्य होईल असंही ते म्हणाले.

हार्ड इम्युनिटी क्षेत्रात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ
सौभर राव यांनी सांगितलं की, पुणे महापालिकेच्या काही भागात सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते. तेथील नागरिकांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती (हार्ड इम्युनिटी) तयार झाल्याचं समोर आलं होतं. त्या परिसरातही पुन्हा रुग्णसंख्या वाढ आहे. त्यामागील कारणमीमांसा आयसर आणि टीसीएस या संस्थांनी केली आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना आवर्जून नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here