महापालिका आयुक्तांकडून घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून ऑक्सिजन आणि व्हेटिंलेटर खाटांची मोठी कमतरता जाणवत आहे. महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये खाटा उपलब्ध दिसतात; मात्र प्रत्यक्षात  गंभीर रुग्णांना खाटा मिळत नाहीत. त्यासाठी ॲाक्सिजन, व्हेटिंलेटर खाटांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त इजेश पाटील यांना केली.  रेमडिसेविर इंजेक्शनचा  तुटवडा दाखवून काळ्या बाजारात त्याची चढ्या दराने  विक्री केली जाते. त्याला आळा घालावा. नियंत्रण ठेवावे. तसेच लसीकरण केंद्रामध्येही वाढ करण्याची सूचनाही  त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी)  महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत बैठक घेतली. शहरातील कोरोना परिस्थितीचा, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोना वॉर रूमला देखील भेट दिली. खाटांच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली.

 शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला आघाडी संघटीका उर्मिला काळभोर, नगरसेवक निलेश बारणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॅा. अनिल रॅाय, डॅा. पवन साळवे, डॅा. वर्षा डांगे, सरीता साने, रविंद्र नामदे उपस्थित होते.

खासदार  बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर गंभीर रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. परिणामी, गंभीर, अतिगंभीर  रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन युक्त,  व्हेटिंलेटर खाटांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे खाटांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. खाटांसाठी त्यांना फिरावे लागत आहे. खाटेअभावी एखाद्याच्या जीव जाता कामा नये.

 महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये खाटा उपलब्ध दिसतात. प्रत्यक्षात नागरिकांना खाटा मिळत नाहीत. त्यासाठी ऑक्सिजनयुक्त व   व्हेटिंलेटर खाटांची संख्या वाढविण्यात यावी. खासगी रुग्णालयांनी   खाटा वाढविण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. त्यांनाही तात्काळ मान्यता द्यावी.

खासगी रुग्णालये  अवाजवी बील अकारणी करत आहेत.  त्याचे ॲाडीट करण्यात यावे. रेमडिसेविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. काळ्या बाजारात चढ्या दराने त्याची विक्री केली जाते. त्याला आळा घालावा. महापालिकेने त्यावर नियंत्रण ठेवावे. वैद्यकीय विभागाने यावर लक्ष ठेवावे.

लसीकरण केंद्रामध्ये वाढ करावी. जास्तीत जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्यास संकटाचा धोका  टळू शकतो. शिवाय बांधितांची संख्या कमी होईल. त्यादृष्टीकोनातून लसीकरण केंद्र वाढवून लसीकरण वाढविण्यावर भर द्यावा.
गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती करावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या.

त्यावर ऑक्सिजनयुक्त व   व्हेटिंलेटर  खाटा वाढविण्यात येतील. रेमडिसेविर इंजेक्शन चढ्या दराने  विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here