चौफेर न्यूज – दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत ठोस निर्णय झालेला नसला तरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यंदा बोर्डाच्या परीक्षेला ‘गॅप’ टाकण्याचा विचार सुरू केला आहे. तर काही जणांनी वेट ऍण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. जूनपर्यंत कोरोना कमी झाल्यास विशेष परीक्षेला बसण्यास विद्यार्थी तयार आहेत.

दहावी, बारावीच्या सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांनी एप्रिल, मे मध्ये होणाऱया बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. एका परीक्षा केंद्रावर सरासरी 500 विद्यार्थी आणि केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशात कोरोनासंदर्भात खबरदारी घेण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे राहिले आहे. काही पालकांनी सांगितले की, ‘पेपर कसा असेल या विचारात असणाऱया विद्यार्थ्यांना सतत मास्क लावणे, सामाजिक अंतरांचे भान ठेवणे, थोडय़ा थोडय़ा वेळाने सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टी लक्षात ठेवणे कठीण जाऊ शकते.’

कोरोना काळात दहावी, बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तारेवरची कसरत होणार आहे, असे शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून कोरोना नियमांचे पालन करून परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यात मोठी दमछाक होण्याची शक्यता आहे. तसेच शिक्षकांचीही आरटीपीसीआर चाचणी करणे, एखादा शिक्षक पॉझिटिव्ह आल्यास अन्य शिक्षकांची नियुक्ती, परीक्षा केंद्र, परीक्षा साहित्याचे सॅनिटायझेशन या गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणताना त्रासदायक ठरणार आहे, असेही मोरे म्हणाले.

बऱयाच पालकांकडून यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी गॅप घेण्याबाबत विचारणा सुरू आहे. कोरोना हे एक कारण आहेच, पण ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सरावच झालेला नाही. त्यामुळे पालकांना या वर्षी ब्रेक हवा आहे. पण आम्ही त्यांना विद्यार्थ्यांचे वर्ष वाया घालवू नका असे आवाहन करीत आहोत. यंदा जून आणि जुलै महिन्यात परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध असल्याचे पालकांच्या निदर्शनास आणून देत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here