पिंपरी :- रावेत बंधाऱ्या लगत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. या जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण तसेच परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नदीतील जलचर प्राणी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास ही जलपर्णी हानिकारक ठरत आहे. तरी बंधाऱ्या लगत वाढलेली जलपर्णी तात्काळ काढावी, अन्यथा युवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
युवासेनेचे चिंचवड विधानसभा युवा उपअधिकारी सागर शिंदे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांना निवेदन दिले आहे. यावेळी पुणे जिल्हा युवासेना प्रमुख सचिन सानप, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख युवासेना अजिंक्य उबाळे, उपजिल्हा प्रमुख युवासेना अमित शिंदे, शाखा अधिकारी कुणाल दर्शिले उपस्थित होते.
युवासेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या पवना नदी पात्रातील रावेत येथील बंधाऱ्या लगत मागील काही दिवसापासून जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील असणारे पाणी सुद्धा दृष्टीस पडत नाही. एवढेच नाही तर पवना नदीपात्रातील जाधव घाट परिसर, केजुबाई बंधारा आदी ठिकाणासह पवना नदीपात्रात सर्वत्र जलपर्णीचा विळखा अधिक घट्ट झालेला पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण तसेच परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता आरोग्य विभाग हे पाहणे आमचे काम नाही असे बेजबाबदार वक्तव्य करत आहे. दिवसेंदिवस जलपर्णी फोफावणे ही बाब गंभीर असून जलचर प्राणी आणि नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. बंधाऱ्या लगत वाढलेली जलपर्णी तात्काळ काढावी व भविष्यात जलपर्णी वाढणार नाही यासाठी जलपर्णीचे काढण्याचे काम ज्या ठेकेदारस दिले आहे त्याचीही चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, तसेच त्याचे बिल अदा करू नये. याबाबत योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा युवासेना या प्रकाराविरोधात आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.