कोरफड वनस्पती सर्वांच्याच परिचयाची आहे. ब्युटी पार्लरमध्ये तर कोरफडीला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे. या वनस्पतीची चव अत्यंत कडू असून अल्प प्रमाणात गोड आहे. हिचा विपाक मधुर तसेच वीर्य शीत आहे. कोरफड कफ आणि पित्तशामक आहे. यकृताच्या आजारावर उपयुक्त असून ती चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी हितकरी आहे. विशेषतः आगीमुळे भाजले असता त्याठिकाणी कोरफडीच्या गरापासून तयार केलेले बँडेज अत्यंत उपयोगी ठरते.
# कोरफड शीत गुणांची असल्यामुळे अम्लपित्त व्याधी असल्यास कोरफड जेलचे सेवन केल्यास पित्त कमी होते आणि दाह कमी होते.
# कोरफड जेल केसांना लावल्यास केस मजबूत होऊन केसगळती कमी होते. कुठल्याही आजारामुळे अशक्तपणा आला असल्यास कोरफड जेल 10 ते 20 मिली दोन वेळा सेवन केल्याने आळस, सुस्ती जाऊन ताकत येते.
# त्वचाविकारात सूर्याच्या उष्णतेने सनबर्न झाले असता कोरफड जेल चेह-यावर लावल्यास चेह-याची दाहकता कमी होऊन त्वचा उजळते.
# डोळे आले असताना कोरफडीच्या पानातील गर डोळ्यावर ठेवला असता डोळ्यांची आग कमी होते तसेच डोळ्यातून वाहणारे पाणी व डोळ्यांची होणारी खाज कमी होते.
# पचन संस्थेचे विकार, यकृताचे आजार, श्वास, कास या व्याधीत कुमारी आसवाचा चांगला फायदा होतो. खोकला झाला असता कोरफडीची पाने गरम राखेत भाजून त्याचा रस काढून त्यात अडुळशाचा रस आणि खडी साखर मिसळून सेवन केल्याने खोकला बरा होतो असे आयुर्वेदात सांगितले आहे.
# कोरफडीच्या गरापासून रसप्रक्रियेने किंवा सूर्याच्या उष्णतेने काळ बोळ तयार केले जातो, हा उष्ण तीक्ष्ण असून याची क्रिया गर्भाशयावर होतो, याने गर्भाशयाचे संकोचन कर्म वाढते त्यामुळे काळ बोळ आणि सागर गोट्यांचे चूर्ण प्रसूतीनंतर गर्भाशयाचे शोधन करण्याकरीता दिले जाते.
# अनार्तव किंवा रजोरोध म्हणजे पाळी साफ न होणे या व्याधीत कोरफडीपासून बनविलेती रज: प्रवर्तनी वटी उपयुक्त ठरते. कोरफडीचे पान तोडले असता त्यातून चिकट स्त्राव निघतो तोच गर, यामध्ये काही पिवळसर भाग असतो या पिवळ्या भागामध्ये विरेचन शक्ती असते म्हणजे पोट साफ होण्यासाठी यालाच विरेचन कर्म करण्यास उपयुक्त ठरतो.
कोरफडीपासून विविध औषधे तयार केले जातात. त्यामध्ये कुमारी आसव, कुमारी पाक, कोरफड जेल, रज: प्रवर्तनी वटी आदी आपल्या आरोग्यसाठी कोरफड ही वनस्पती फारच लाभदायी आहे. या कोरफड वनस्पतीचे जतन व संवर्धन करणे फार गरजेचे आहे.