केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह आठ आमदार अशी पुण्यात भाजपची घसघशीत ताकद आहे. पुणे महापालिका जिंकण्याचे भाजप नेत्यांचे मनसुबे आहेत, ते लपून राहिलेले नाहीत. तीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमध्येही आहे. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे यांच्यासह राष्ट्रवादीची ताकतीची फळी भाजपमध्ये दाखल झाली आहे. पुणे जिल्ह्यात भाजपला स्वत:ची ताकद वाढवायची असल्यास प्रत्येक ठिकाणी भाजपला राष्ट्रवादीशी लढावे लागणार आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादीची मिलीभगत दिसून येते, ती पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांच्यात सामना होणार की, ‘नुरा कुस्ती’चा खेळ होणार, याविषयी शंकाच उपस्थित केली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येतात आणि शरद पवार यांचे भरभरून कौतुक करतात. पवार दिल्लीत सतत मोदी यांच्या संपर्कात असतात, त्यांना मार्गदर्शनही करतात. काँग्रेसचे उद्याचे नेतृत्व राहुल गांधी यांच्या विरोधातील रणनीती एकविचाराने ठरवली जाते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये अशाप्रकारे गुफ्तगू सुरू असताना महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती असू शकते का, तर नक्कीच नाही.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात छुपी युती झाली. काँग्रेसला खड्ड्यात घालण्यासाठी राष्ट्रवादीने खड्डा खोदला; मात्र त्या खड्ड्यात पडण्याची वेळ राष्ट्रवादीवरच आली. केवळ पुण्याची जागा त्यांच्या पदरात पडली; मात्र त्याचेही श्रेय राष्ट्रवादीला घेता येणार नाही. कारण, अनिल भोसले निवडून आले, त्यात पक्षापेक्षा त्यांची वैयक्तिक यंत्रणा महत्वपूर्ण ठरली. ते भाजपमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारीत होते. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली असती, तर ते भाजपचे उमेदवार असते आणि तरीही ते निवडून आलेच असते. त्यानंतर, नगरपालिका निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही भाजपला घवघवीत यश मिळाले. पहिल्या टप्प्यात राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजप पुढे आला. या यशाचे बहुतांश श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाले. आता 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होते आहे.
पुणे जिल्ह्यातील 10 नगरपालिकांचा त्यामध्ये समावेश आहे. या निवडणुकांमध्येही भाजप पहिल्या क्रमाकावर राहिला पाहिजे, यादृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पुण्याचा झंझावती दौरा केला. लोणावळा, तळेगाव, आळंदी, शिरूर आणि बारामतीत त्यांनी आक्रमक प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराची चिरफाड करतानाच त्यांनी बारामतीत जाऊन पवारांच्या राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची भाषा केली. पहिल्या टप्प्याप्रमाणे जर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाच, तर निश्चीतपणे आपली रणनीती बदलण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे पर्याय राहणार नाही. काँग्रेसला खड्ड्यात घालण्याच्या नादात राष्ट्रवादीने भाजपचे बळ वाढवणारे धोरण राबवले आहे, ते त्यांना बदलावे लागेल.
भाजपचे सरकारच मुळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आहे. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका बजावत आहे. सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची सेनेची कितीही इच्छा असली, तरी तशी कृती ते करत नाहीत. कारण, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी टेकू द्यायला केव्हाही तयार आहे. यापूर्वी, राष्ट्रवादीने तसे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे मेतकूट आता सर्वांना माहिती झाले आहे.
भाजपला मदत करून राष्ट्रवादीचा काही फायदा होत नाही. त्या तुलनेत भाजपला मात्र बऱ्यापैकी लाभ होताना दिसतो आहे. दिल्लीत राज्यसभेत राष्ट्रवादीची भूमिका भाजपला मदत करणारी आहे. राज्यात सरकारच्या पाठिंब्याचा विषय असो की, विधान परिषद व नगरपालिका निवडणुकांचा. भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती अशीच कायम राहिल्यास आगामी काळात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न दोन्हीकडील कार्यकर्त्यांपुढे निर्माण होऊ शकतो.
पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे व अन्य एक मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह भाजपचे आठ आमदार अशी भाजपची घसघशीत ताकद आहे. पुण्याची महापालिका जिंकण्याचे भाजप नेत्यांचे मनसुबे आहेत. तीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडची आहे. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे यांच्यासह राष्ट्रवादीची ताकतीची फळी भाजपमध्ये दाखल झाली आहे. जिल्ह्यात भाजपला स्वत:ची ताकद वाढवायची असल्यास प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीशी लढावे लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षात सध्या सुरू असलेला संघर्ष खरा आहे की, नुरा कुस्तीचा प्रकार आहे, हे पहावे लागणार आहे. त्यानंतरच पुढील काळातील भाजपची राष्ट्रवादीशी आणि राष्ट्रवादीची भाजपशी लढण्याची रणनीती ठरणार आहे.