पिंपरी :- सोशिओ कॉर्प इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित भारतातील सर्वात मोठ्या सीएसआर चित्रपट महोत्सवात रेडबड मोशन पिक्चर्स दिग्दर्शित शाळाबाह्य मुलांच्या जीवनावर आधारित असलेल्या निशाण लघुपट व बालकामगार यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा लेहरायेगा तिरंगा या देशभक्तीपर गीताला सर्वोत्कृष्ट गीत व लघुपट म्हणून पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते लेखक व दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सोशिओ कॉर्प इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चेतन गांधी, संचालिका सरस्वती मेहता, बाळासाहेब झरेकर, सतीश कोंढाळकर, विजय कुलकर्णी, संगीतकार श्रेयस देशपांडे, अभिनेत्री प्रज्ञा पाटील, अभिनेता रोहीत पवार, नेहा नाणेकर, योगेश कावली आदी मान्यवर उपस्थित होते. देशभरातील अनेक सामाजिक संस्था, कॉर्पोरेट्स यांनी आपल्या सामाजिक जाणीवेतून मांडलेल्या विषयांचा समावेश असलेले चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आले. महोत्सवासाठी सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक विषयावरील तब्बल ५२ चित्रपटांनी सहभाग नोंदविला.
“लेहरायगा तिरंगा” व निशाण लघुपटाद्वारे शाळाबाह्य मुले, बालकामगार यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी काम करणारे बालमजूर व शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात आण्यात येते. व त्या मुलांची भारत देशाप्रती असलेली देशभक्ती या गीताच्या व लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. बालमजूर कायदा व शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य उद्दिष्टाने या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
या गाण्यात पिंपरीतील नेहरूनगर विठ्ठल नगर पुनर्वसन झोपडपट्टीतील मुलांनी प्रथमच कॅमेरा समोर अभिनय केला आहे. आशिष नाटेकर या बाल कलाकाराने मुख्य भूमिका साकारली आहे. सह बालकलाकार म्हणून गौरव कदम, ओवी दैठे, कुणाल गायकवाड, वेदांत डोंगरे, कुमार अवचर, संतोष सगुंडे, कार्तिक जेगरी, अवनिश नाणेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळाबाह्य मुले व बालकामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या लेहरायेगा तिरंगा या गाण्याचे नेहरूनगर पिंपरीतील लेखक व दिग्दर्शक अरविंद भोसले, आशिष कुलकर्णी, श्रेयश देशपांडे, प्रज्ञा पाटील यांना थेट पत्र लिहून या गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्यामुळे लेहरायेगा तिरंगा या गाण्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.