पिंपरी :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी ही नियुक्ती केली आहे.
विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्षपद भूषवत असताना मोठ्या प्रमाणात आंदोलने मोर्चे काढून सत्ताधारी भाजपला नागरिकांच्या प्रश्नावर कोंडीत पकडले होते. नागरिकांच्या हिताचे अनेक मुद्दे घेऊन त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. राज्यातील सर्वात कुशल युवक संघटन उभारले होते.
पक्षाकडून करण्यात आलेल्या नियुक्तीबद्दल बोलताना विशाल वाकडकर यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे अनेक प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी पदाची नियुक्ती सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राधान्य असणार आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटना वाढीस प्रोत्साहन देणार आहे.