‘शिक्षण हे मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाचे एक मूलभूत साधन आहे’ हा विचार आता जगभर मान्य झाला आहे. भारतातही ज्ञानार्जन आणि ज्ञानदान यांना अनादिकालापासून अग्रस्थान देण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तर शिक्षणाला एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होताच आपण आपल्या भाग्याचे शिल्पकार झालो. राष्ट्र समृद्ध व बलशाली करण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले. त्यासाठी आपण लोकशाही जीवनपद्धतीचा स्वीकार केला. लोकशाही सुस्थिर होण्यासाठी, लोकशाही जीवनमूल्ये रुजण्यासाठी आणि प्रगतिपथावरील वाटचाल द्रुतगतीने करण्यासाठी शिक्षण-प्रसाराची गरज आपण ओळखली. नियोजनपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे प्रगतीचे काही टप्पे गाठण्यात आपण यशही मिळविले.
पहिल्या तीन पंचवार्षिक योजना आखताना आपले प्रमुख उद्दिष्ट शिक्षण-प्रसार हे असल्याने या कालावधीत शिक्षणसंस्था व विद्यार्थी यांची संख्या खूप झपाट्याने वाढली. प्रत्येक मुला-मुलीला थोडे तरी शिक्षण दिलेच पाहिजे, ही जी अविकसित राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाची पहिली पायरी असते, ती प्राथमिक शिक्षण क्षेत्रात तरी बऱ्याच प्रमाणात ओलांडली गेली आहे. परन्तु शिक्षण-प्रसाराशी निगडित अशी नेहमीची समस्या म्हणजे शिक्षणाचा खालावत जाणारा दर्जा. त्यामुळे शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याची गरज तीव्रतेने जाणवू लागली. म्हणून चवथ्या पंचवार्षिक योजनेत शिक्षण-प्रसाराबरोबरच त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष पुरविण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. अर्थात् शिक्षणाचादर्जा उंचावण्याचे प्रयत्न यानंतरही किमान दोन तीन पंचवार्षिक योजनांमध्ये कसोशीने चालू ठेवावे लागतील.आणि असे प्रयत्न शासकीय यंत्रणा व जनता यांच्या संपूर्ण सहकार्याने झाले तरच आजच्या शिक्षण-प्रसाराचा उपयोग देशाच्या विकासासाठी होऊ शकेल. प्रत्येकाला शक्य तितके शिक्षण ही पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांतील घोषणा होती. पुढील तीन योजनांमध्ये प्रत्येकाला सुयोग्य व दर्जेदार शिक्षण ही घोषणा असावी लागेल. अशा रीतीने ‘दर्जेदार शिक्षण’ ही आपल्या देशाची आजची निकडीची गरज ठरली आहे.
शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्याच्या सर्व अंगोपांगांचा विचार झाला पाहिजे. विशेषतः समोर उभ्या असलेल्या समस्यांचे बारकाईने निदान करून त्या सोडविण्यासाठी सुसंबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत. शालेय शिक्षणाच्या दर्जावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. त्यांपैकी शालेय प्रशासन व निरीक्षण, शिक्षकांची सामाजिक व व्यावसायिक स्थिती, प्रशिक्षण पद्धती व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, विद्यालयांचे कार्य, शालेय स्तरावरील अभ्यासक्रम, वापरण्यात येत असलेली पाठ्यपुस्तके, अध्यापनपद्धती, शैक्षणिक योजनांची घडण व त्यांचे मूल्यमापन, शिक्षक संघटनेचे कार्य, शिक्षक, पालक, प्रशासक यांचे परस्परांना मिळत असलेले साह्य या बाबी अधिक महत्त्वाच्या असतात. त्यांतही शालेय स्तरावर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रथम लक्ष पुरविले पाहिजे ते अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन या शैक्षणिक प्रक्रियांकडे. ही गरज लक्षात घेऊन प्रस्तुत लेखात दर्जेदार शिक्षणाच्या ‘अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन ‘ या प्रमुख प्रक्रियांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून संकलितपणे विवेचन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विकास व शिक्षण विकसित राष्ट्र म्हणजे समृद्ध राष्ट्र. म्हणून कोणत्याही राष्ट्राची विकासाची वाटचाल म्हणजे समृद्धीकडील वाटचाल होय. राष्ट्राकडे असलेली संपत्ती ही त्या राष्ट्राच्या समृद्धीची निदर्शक असते. संपत्ती जितकी जास्त तितके ते राष्ट्र समृद्ध. संपत्ती म्हणजे शेती, उद्योग, खाणी यांमधून होणारे उत्पादन. राष्ट्राचा विकास साधावयाचा म्हणजे राष्ट्र समृद्ध करावयाचे. समृद्धी आणावयाची म्हणजे संपत्ती वाढवावयाची. संपत्तीत वाढ करावयाची म्हणजे सर्व प्रकारचे उत्पादन वाढवावयाचे. देशाचे उत्पादन वाढते कसे ? शेती किंवा कारखाने यांमधून वस्तू आपोआप निर्माण होत नाहीत. काम करून माणसाला त्या निर्माण कराव्या लागतात. विविध वस्तूंच्या उत्पादनपद्धतींचे ज्ञान असणारी, उत्पादन-बाढीच्या नव्या पद्धती शोधून काढणारी, अशा पद्धती कुशलतेने राबविणारी कार्यक्षम व कष्ट करणारी माणसे ज्या देशात असतात त्या देशाचे उत्पादन वाढते व तेथे समृद्धी येते. त्यासाठी देशातील मानवी संपत्तीचा प्रथम विकास करावा लागतो.
आज आपल्या राष्ट्राची गणना विकसनशील राष्ट्रांत केली जाते. कारण आपण विकासाच्या मार्गावर आहोत. अद्याप आपणांस खूप वाटचाल करावयाची आहे. उत्पादनाच्या सर्व क्षेत्रांत आधुनिक व अद्ययावत ज्ञान असणारी, नव्या पद्धती व तंत्र शोधून काढणारी आणि अशी माणसे तयार करणे ही आपल्या देशाची आजची खरी गरज आहे.
अशी माणसे कुठे व कशी तयार होतात ? ‘ शिक्षणातून’ हे त्याचे साधे, सरळ व एकमेव उत्तर आहे. ‘ व्यक्तीच्या वर्तनात इष्ट दिशेने परिवर्तन करणारी आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणणारी प्रक्रिया’ म्हणजे शिक्षण. बुद्धीचा विकास, ज्ञानसंपादन, संपादित ज्ञानाच्या उपयोजनाची क्षमता, विविध प्रकारची कौशल्ये, संशोधनाची वृत्ती इत्यादी शिक्षणातूनच साध्य होतात. शिक्षण माणसाला घडविते आणि मनुष्य त्याला मिळालेल्या शिक्षणाच्या आधारे उत्पादनकार्यात भाग घेऊन संपत्ती निर्माण करतो. शिक्षण आणि उत्पादन यांचा असा निकटचा संबंध आहे.
देशाचे उत्पादन जसजसे वाढत जाते तसतसा त्याचा आर्थिक पाया मजबूत व भक्कम होत जातो. पण केवळ एवढे साध्य झाल्याने देश सुखी होत नाही. आर्थिक क्षेत्राप्रमाणे सामाजिक व राजकीय क्षेत्रांतही प्रगती होणे आवश्यक असते. देशातील नागरिकांनी आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन केले पाहिजे. कालबाह्य सामाजिक रूढी टाकून देऊन नव्या परंपरा निर्माण केल्या पाहिजेत. राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता वाढीस लावली पाहिजे.
लोकशाहीतील नागरिकांच्या जबाबदाऱ्या ओळखून सहजीवनाचे तत्त्व अंगी बाणविले पाहिजे. स्वातंत्र्य, न्याय व समता यांचा अंगीकार केला पाहिजे. देशाच्या संरक्षणकार्यातील आपला वाटा उचलून राष्ट्रास बलशाली केले पाहिजे. हे सर्व शिक्षणामुळेच घडू शकते. शिक्षण हे आर्थिक, सामाजिक व राजकीय परिवर्तन घडवून आणण्याचे एक महत्त्वाचे आणि प्रभावी साधन आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, राष्ट्राचा विकास त्या राष्ट्रात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. “भारताचे भवितव्य भारताच्या विद्यामंदिरात घडविले जात आहे.” आपण ज्या प्रकारचे शिक्षण घेऊ त्या प्रकारचा भारत घडवू असाच त्याचा अर्थ होत नाही का ? म्हणूनच आपल्या आकांक्षेनुसार राष्ट्रीय विकास साधता येण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची नितांत गरज आहे.
शिक्षणाचे साध्य……
शिक्षणाच्या संदर्भात तीन महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. शिक्षण का किंवा कशासाठी द्यावयाचे, हा पहिला महत्त्वाचा प्रश्न होय. ईप्सित साध्य करण्यासाठी, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर. ईप्सित म्हणजे ठरविलेली किंवा निश्चित केलेली उद्दिष्टे. कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी उद्दिष्टांची स्पष्ट कल्पना असली पाहिजे. उद्दिष्ट स्पष्ट व निश्चित नसेल तर कोणत्या दिशेने व कसे जावयाचे हे कळत नाही. शिक्षणाच्या बाबतही हे तितकेच खरे आहे. शिक्षणाबद्दल विचार करताना सर्वप्रथम उद्दिष्टांचाच विचार झाला पाहिजे. उद्दिष्टे निश्चित झाली की शिक्षण कोणते व कसे द्यावयाचे हे ठरविता येते. उद्दिष्टे म्हणजे शिक्षण-प्रक्रियेची मार्गदर्शक तत्त्वे होत. उद्दिष्टांमुळेच शिक्षण-प्रक्रियेत खऱ्या अर्थाने सहेतुकता निर्माण होते व तिला योग्य दिशा मिळते आणि अपेक्षित वळण लागते.
शिक्षण म्हणजे संस्कारांतून व्यक्तीच्या वर्तनात घडून येणारे बदल. हे बदल ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक अशा तीन क्षेत्रांत घडून येत असतात. व्यक्तिविकासाच्या या तिन्ही क्षेत्रांत व्यक्तीच्या वर्तनात नेमकी कोणती परिवर्तने अपेक्षित आहेत किंवा हवी आहेत हे सांगणे म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे सांगणे होय. ही उद्दिष्टे राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत असावी लागतात. शिक्षणातून व्यक्तीच्या वर्तनात बदल करून जे व्यक्तिमत्त्व घडविले जाईल ते राष्ट्राच्या विकासात आपला वाटा उचलू शकणारे असले पाहिजे. राष्ट्राचा विकास शिक्षणावर अवलंबून आहे. म्हणून राष्ट्रविकासाची उद्दिष्टे लक्षात घेऊन शिक्षणाची उद्दिष्टे निर्धारित केली पाहिजेत. उद्दिष्टे ठरविल्यानंतर ती साध्य करण्याच्या दृष्टीनेच शैक्षणिक उपक्रमांची आखणी केली पाहिजे. उद्दिष्टे जितकी सुस्पष्ट असतील तितके शिक्षण दर्जेदार होण्यास मदत होते.
गतिमान समाजाच्या गरजा भागविण्यासाठी समर्थ अशा शिक्षणपद्धतीचे प्रमुख विशेष कोणते हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे द्यावे लागेल : अशा शिक्षणपद्धतीने शिक्षितांमध्ये समस्या सोडविण्याची पात्रता निर्माण केली पाहिजे. उपलब्ध माहितीचे विश्लेषण करणे, प्रगतीविषयी औत्सुक्य बाळगणे, मूलगामी प्रश्न विचारणे, प्रचलित पद्धतीच्या योग्यायोग्यतेविषयी साधकबाधक विचार करणे इत्यादींचे शिक्षण विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर मिळाले पाहिजे. ते साधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः विचार करण्याचे कठीण काम अंगीकृत केले पाहिजे; आणि त्यांना त्यांच्या जीवनाशी (व्यक्तिगत व राष्ट्रीय ) सुसंगत असलेला अभ्यासक्रम शिकविण्याची सोय झाली पाहिजे.
जर शैक्षणिक प्रक्रिया मानवी प्रगतीचे एक प्रभावी साधन ठरावयाची असेल तर तिने शिक्षण घेणाऱ्यांच्या आशा-आकांक्षा आणि जीवनोद्दिष्टे यांच्याशी प्रतारणा करता कामा नये. या दृष्टीने ऑक्टोबर १९७२ मध्ये वर्धा येथे भरलेल्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेने केलेल्या शिफारसी फार महत्त्वाच्या आहेत. सदर परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, “आधुनिक जगात जी विविध स्वरूपाची आव्हाने निर्माण होत आहेत त्यांना योग्य त्या रीतीने तोंड देता यावे अशा स्वरूपाचे शिक्षण द्यावयास हवे. आजच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणात मूलभूत सुधारणा व्हावयास हवी. केवळ पुस्तकी विद्येवर भर दिला न जाता व्यक्ती हरहुन्नरी बनविणारे व जीवन-कलहात यशस्वी ठरविणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. “