पिंपळनेर : प्रचिती स्कुल पिंपळनेर येथे समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य झोकणारे, शिक्षणमहर्षी थोर भारतीय समाजसुधाकर, क्रांतीसूर्य “महात्मा ज्योतिबा फुले” यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर 1890) पुण्यतिथी! सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाज सुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी ज्योतिबांनी धडपड केली. “विद्येविना मती गेली, मती बिना निती गेली, निती विना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्येने केले” या ओवीतून जगाला शिक्षणाचा उपदेश दिला. महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणाचे जनक असेही संबोधले जाते, असे मत मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी व्यक्त केले. प्रचिती पब्लिक स्कुलमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी केले.
ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर काम केले. जनतेने त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी 1888मध्ये बहाल केली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिबांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. यावेळी शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिनल सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.