पिंपरी : युवकांमधील गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने “मेरा युवा भारत” उपक्रम राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये “मेरा युवा भारत” या उपक्रमाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या वतीने लाईट हाऊस कम्युनिटीज या संस्थेच्या सहकार्याने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या मार्गदर्शन सत्रामध्ये लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या क्लस्टर हेड पूजा मोगरे, सहाय्यक व्यवस्थापक लखन रोकडे, फॅसिलिटेटर आणि समुपदेशक प्रियांका घोलप, युवा समन्वयक रेश्मा कांबळे, डिजिटल एम्पावरमेंट फॅसिलिटेटर अमिषा मिश्रा, केपीएमजी कंपनीच्या वतीने मा. विनायक पदमाने आणि पीसीएमसी स्मार्ट सारथीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
युवक आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये लाईट हाऊस कम्युनिटीज या संस्थेच्या वतीने विविध कोर्स सुरु करण्यात आले आहेत. हे कोर्स रोजगाराभिमुख असून नि:शुल्क उपलब्ध आहेत. लाईट हाऊस प्रकल्पामध्ये अनेक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सदर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आज प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. त्या निमित्ताने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
मेरा युवा भारत उपक्रमामध्ये सहभागी झाल्यास युवकांना रोजगार, व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या वतीने सदर प्रशिक्षणार्थ्यांना मेरा युवा भारत उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मेरा युवा भारत संकेतस्थळाची माहिती देण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत अॅप असलेल्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपविषयी माहिती देण्यात आली. केपीएमजी कंपनीचे मा. श्री. विनायक पदमाने यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.