पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल ते कर्जत पर्यंत नवीन रेल्वे मार्गाचे काम चालू आहे. कर्जत ते लोणावळ्यापर्यंत रेल्वे मार्गाचा सर्व्हे करावा. ट्रॅकची लाइन वाढवावी. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत केली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागला आहे. लोणावळा ते पुणे या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला 2017 मध्ये मंजुरी मिळाली आहे. पनवेल ते कर्जत पर्यंत नवीन रेल्वे मार्गाचे काम चालू आहे. हा मार्ग लोणावळ्यापर्यंत असणे आवश्यक आहे. लोणावळा मोठे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे लोणावळ्याला पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यासाठी कर्जत ते लोणावळापर्यंत रेल्वे मार्गाचा सर्व्हे करावा. ट्रॅकची लाइन वाढवावी . त्याचा सविस्तर विकास आराखडा (डीपीआर) तयार करावा. पनवेलला नवीन विमानतळ होत आहे. त्यामुळे पनवेलवरून पुण्यापर्यंत एक्स्प्रेस, लोकल रेल्वे धावू शकतील. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल.
पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यासाठी 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. परंतु, डीपीआर तयार करताना त्याचा खर्च 2100 कोटी होता. 2022 मध्ये खर्च 2200 कोटी रुपयांवर गेला. आता साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा खर्च गेला आहे. त्यात जागा भूसंपादनासह सर्व कामाचा समावेश आहे. याचा 50 टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि 50 टक्के राज्य सरकार अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या 50 टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे. ट्रॅकचे काम पूर्ण होण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.