पक्षनिष्ठा ही कागदावरच राहिली आहे, राजकीय सोय महत्त्वाची ठरते आहे. त्यामुळे पक्षात येणारे पाहुणे आपल्या ताटातील घास घेण्यासाठी येत आहेत, असा विचार मूळ पक्षात असणार्यांच्या मनात येऊ लागला आहे. राजकीय नेत्यांनीही अन्य निकष बाजूला ठेवून फक्त निवडून येण्याची शक्यता, याच मुद्द्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्वच पक्षात अस्वस्थता आहे. पाहुणे तुपाशी आणि घरचे उपाशी, असे प्रातिनिधीक चित्र सर्वच राजकीय पक्षात आहे. भाजप व त्याखालोखाल राष्ट्रवादीतील पाहुण्यांची संख्या जास्त आहे, इतकाच काय तो फरक आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या काय चालले आहे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कारण याने पक्ष सोडला, त्याने पक्ष सोडला, या चर्चेलाच सध्या उधाण आले आहे. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक नगरसेवकांनी आपला मूळचा पक्ष सोडला आहे आणि नव्या पक्षात प्रवेश केला आहे. या राजकीय कोलांटउड्यांचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे आणि सर्वात जास्त गर्दी भाजपमध्ये झाली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापासून सुरू झालेले गर्दीचे लोण आमदार महेश लांडगे व नंतर माजी महापौर आझम पानसरे यांच्यामार्फत भाजपमध्ये सुरूच आहे. मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे आता भाजपमध्ये इतकी गर्दी झाली आहे की, ‘रिव्हर्स गियर’ पडू लागले आहेत. म्हणूनच की काय, पहिल्या ‘लॉट’मध्ये भाजपमध्ये गेलेले राजेंद्र साळुंके, त्यानंतरचे आर.एस. कुमार आणि शरद बोर्हाडे पुन्हा स्वगृही परतले आहेत.
भाजपमध्ये वाढणार्या गर्दीमुळे पक्षातील निष्ठावान वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता दिसू लागली आहे. नव्याने येणारे लोंढे म्हणजे आपल्यावर होणारे अतिक्रमण असून, त्यामुळे आपल्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना या वर्गात आहे. अशा कितीतरी जागा आहेत, जिथे जुन्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी दावे केले असताना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. हेच चित्र थोड्याफार फरकाने राष्ट्रवादीतही आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यासाठी रीघ लागलेली असतानाच काँग्रेसला खिंडार पाडून सात नगरसेवक व त्यांचे समर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणण्याची खेळी अजित पवार यांनी केली.
शहराच्या राजकारणात सुरू झालेला आयाराम-गयारामचा हा खेळ निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरूच राहणार आहे. अजूनही कितीतरी नावे अशी आहेत, ज्यांचे पक्षांतर निश्चित आहे. मात्र, योग्य टायमिंगच्या प्रतिक्षेत ते आहेत. एकीकडे अशा घडामोडी सुरू असताना, भाजप-शिवसेनेच्या युतीच्या बैठका होत आहेत. आतापर्यंत चर्चेचे गुर्हाळ चालले. मात्र, ठोस निर्णय झाला नाही. भाजप-शिवसेनेत युती व्हावी, असा वाटणारा वर्ग कमी आहे आणि ती होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असणारे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळेच युतीचे भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे. युती झाल्यास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आनंद होण्याची जितकी शक्यता आहे. तितकीच शक्यता त्यांच्यात नाराजी होण्याचीही आहे. असे अनेक प्रभाग आहेत, जिथे भाजप-शिवसेनेचे उमेदवार खूपच पुढे गेले आहेत. युती झाली तरी माघार घेण्याच्या स्थितीत ते असणार नाहीत. त्यामुळे एकतर बंडखोरी होण्याची शक्यता आहे किंवा आयत्या वेळी दुसर्या पक्षांचे दरवाजे ठोठावण्याचे काम ही मंडळी करणार, यात कोणतीच शंका नाही. भाजप-शिवसेनेत युती झाली तरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची शक्यता आहे. युती नाही तर आघाडीही नाही, हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. विधानसभा निवडणुकांचा अनुभव पाहता शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते. त्यामुळेच सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवली आहे. सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार मिळणे, सगळ्याच पक्षांसाठी आव्हानात्मक बाब आहे. विशेषत: महिला आणि राखीव जागांसाठी उमेदवारांची सर्वच पक्षांची शोधाशोध सुरू आहे.
आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जेमतेम 35 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. या कालावधीत भला मोठा प्रभाग पायाखालून काढणे, मोठे जिकीरीचे काम आहे. केवळ नमस्कार करून मते मिळत नाहीत. नागरिकांशी उमेदवारांचा विविध पातळीवर संवाद व्हायला हवा; मात्र प्रभागांचे क्षेत्र व मतदारांची संख्या पाहता कोणत्याही उमेदवारांचा ‘फेस टू फेस’ संपर्क होणार नाही. त्यामुळे पक्षीय पातळीवर होणारे मतदान हेच प्रत्येक उमेदवाराचे बलस्थान राहणार आहे. अपक्ष किवा बंडखोराला यापूर्वी मिळत होता, तसा प्रतिसाद यंदा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मिळेल त्या पक्षाचे तिकीट घेण्याकडे इच्छुक उमेदवारांचा कल आहे. पक्षनिष्ठा ही कागदावरच राहिली आहे, राजकीय सोय महत्त्वाची ठरते आहे. त्यामुळे पक्षात येणारे पाहुणे आपल्या ताटातील घास घेण्यासाठी येत असावेत, असा विचार मूळ पक्षात असणार्यांच्या मनात येऊ लागला आहे.
राजकीय नेत्यांनीही अन्य निकष बाजूला ठेवून निवडून येण्याची शकयता, याच मुद्द्याला प्राधान्य दिल्याने सर्वच पक्षात अस्वस्थता आहे. पाहुणे तुपाशी आणि घरचे उपाशी, असे सर्वच राजकीय पक्षातील चित्र आहे. भाजप व त्याखालोखाल राष्ट्रवादीतील पाहुण्यांची संख्या जास्त आहे, इतकाच काय ते फरक आहे.