पिंपरी :- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड शहरात करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध ठिकाणी १२३ केंद्रे असून या सर्व अर्जस्विकृती केंद्रांवर समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर (संगणक चालक), मदतनीस, सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.
योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या सर्व अधिकृत सोशल मिडीया हॅन्डल्स तसेच अधिकृत संकेतस्थळावर योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून अर्ज करण्याची प्रक्रियेची देखील माहिती देण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी माहितीदर्शक स्टँडीज, फ्लेक्स, बॅनर्स सर्व क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पालिकेच्या व्हीएमडीवरही योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त योजनेचे माहितीदर्शक व्हिडीओ, मेसेजेस, जिंगल्स तयार करून प्रसारित करण्यात येत असून योजनेची माहितीदर्शक भित्तीपत्रके, हस्तपत्रिका आणि पॅम्प्लेट्स तयार करण्यात येत आहे.
महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, करसंकलन विभागीय कार्यालये आदी ठिकाणी अर्ज स्विकृती केंद्र चालू करण्यासाठी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्ज स्विकृती केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली असून शिबिरासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर शिबिराच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने गर्दीचे योग्य नियोजन करून त्यानुषंगाने कार्यवाही करण्यासाठी एम.एस.एफ जवान तसेच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेच्या अटी शर्ती, पात्र अपात्र यांचे निकषांची माहिती लाभार्थींना देण्यासाठी तसेच पात्र महिलांच्या कागदपत्रांची छाननी, दैनंदिन अहवाल आदी बाबींची पुर्तता करण्यासाठी केंद्रांवर व्यवस्थापक, मुख्य लिपीक, समुह संघटक, समुदाय संघटक, मदतनिस यांची नेमणूकही करण्यात आली आहे, जेणेकरून लाभार्थी महिलांना योजनेबद्दल तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची, पात्र, अपात्रतेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. केंद्रांवर येणाऱ्या अर्जदारांच्या सोयीसाठी फिरते शौचालय, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून दैनंदिन साफसफाई करण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर योग्य समन्वयासाठी नोडल अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी यांना कामकाज सोपविण्यात आले असून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप –
• प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डिबीटीद्वारे दरमहा १ हजार ५०० रुपये इतकी रक्कम दिली जाईल.
योजनेचे लाभार्थी –
• महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
पात्रता –
• महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
• राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला.
• किमान वयाची २१ वर्षे पुर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
• लाभार्थीचे स्वत:चे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक
• लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
• आवश्यक कागदपत्रे –
• आधारकार्ड (अर्जामध्ये आधारकार्डवरील नाव नमुद करावे)
• अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला (अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड / मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
• महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र.
• उत्पन्न प्रमाणपत्र (रु. २.५० लाखापर्यंत) / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
• अर्जदाराचे हमीपत्र
• बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
• अर्जदाराचा फोटो (स्वत: लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक)
अपात्रता –
• कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
• ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
• ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम / कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
• सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रू. १५०० किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
• ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
• ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य आहेत.
• ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (टॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
अर्ज भरण्याची पद्धत –
• योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाईल ऍपद्वारे / सेतु सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
अर्ज भरण्याची प्रक्रिया –
• पात्र महिलेस ऑनलाईन नारीशक्ती दूत ऍपद्वारे अर्ज करता येईल.
• ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी / ग्रामीण / अदिवासी) / ग्रामपंचायत / वार्ड / सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल. तसेच या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
• वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी / ग्रामीण / आदिवासी) सेतू सुविधा केंद्र येथे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल व प्रत्येक अर्जासाठी यथयोग्य पोचपावती दिली जाईल.
आयोजित शिबीराच्या ठिकाणांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय माहिती –
अ क्षेत्रीय कार्यालय
• कापसे उद्यान नाना नानी पार्क जेष्ठ नागरीक हॉल, मोरवाडी
• राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन,मोहननगर.
• करसंकलन कार्यालय पांडुरंग काळभोर हॉल आकुर्डी
• म.न.पा.शाळा, भाटनगर, पिंपरी
ब क्षेत्रीय कार्यालय
• नुतन इमारत किवळेगावठाण
• म.न.पा.प्राथमिक शाळा वाल्हेकरवाडी
• ब क्षेत्रिय कार्यालय चिंचवड
• म.न.पा.प्राथमिक शाळाBRTरोड काळेवाडी
• बुध्दविहार (संजय गाधी नगर मोशी)
• जाधववाडी जुनी शाळा
• अकुशराव लांडगे नाटयगृह (भोसरी)
क क्षेत्रीय कार्यालय
• बुध्दविहार (खंडेवस्ती)
• बाल नगरी बालाजीनगर
• आण्णाभाऊ साठे समाज मंदिर (नेहरुनगर)
• सावित्रीबाई फ़ुले स्मारक सभागृह
ड क्षेत्रीय कार्यालय
• विरंगुळा केंद्र पिंपळे नीलख
• विरंगुळा केंद्र पोलीस कॉलनी वाकड
• समाज मंदिर पूनावले
• सह्याद्री आदिवासी महिला सभागृह सृष्टी चौक पिंपळे गुरव
ई क्षेत्रीय कार्यालय
• वाघेश्वर महाराज जेष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र चऱ्होली गाव
• सैनिक भवन दिघी
• बहुउद्देशीय इमारत बोपखेल
• सखुबाई गवळी गार्डन मधील हॉल
• परशुराम गवळी बॅडमिटन हॉल दिघी, रस्ता भोसरी
• पीसीएमटी चौक बहुउद्देशीय इमारत हॉल गव्हाणे वस्ती भोसरी
• सर्वे नं. २२९/१. एन बी फुले बिल्डींग, दुसरा मजला
• भैरवनाथ मंदिर सभाग्रह , भोसरी गावठाण
फ क्षेत्रीय कार्यालय
• टाऊन हॉल घरकुल चिखली
• चिखली मनपा शाळा पार्किंग, म्हेत्रे वस्ती चिखली
• प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा रुपीनगर
• बाळासाहेब ठाकरे सभागृह नाना नानी पार्क यमुना नगर निगडी
• शिवतेज नगर सांस्कृतिक हॉल,चेरी स्वीट च्या मागे
• मनपा शाळेजवळील हॉल तळवडे गावठाण
ग क्षेत्रीय कार्यालय
• माध्यमिक विद्यालय थेरगाव
• लक्ष्मीबाई बारणे उद्यान थेरगाव
• धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान रहाटणी
ह क्षेत्रीय कार्यालय
• महात्मा फुले वाचनालय लांडेवाडी भोसरी
• सरदार वल्लभाई पटेल बॅडमिंटन हॉल वल्लभनगर पुणे
• शहीद भगतसिंग मनपा शाळा दापोडी
• उर्दू शाळा कासारवाडी
• पि.सी.एम.सी.पब्लिक स्कूल प्राथमिक शाळा क्रं 54.पिंपळे गुरव
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा जुनी सांगवी
• रामायण मैदान सभागृह जाधववाडी चिखली.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक – १८१