पिंपरी :- सध्या पावसाळा सुरू आहे. शहरात साथीच्या आजाराने रुग्ण वाढत असून अशातच शहरात डेंगू रुग्णांची संख्या देखील वाढत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे असून, यावर तात्काळ उपाययोजना करा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
शहरात अनेक सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी, झाडाची कुंडी, पाळीव प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेली भांडी, टायर, मोकळे डब्बे, आदी ठिकाणी पाणी साठवले जाते. त्या साठवलेल्या पाण्यात डेंगू डासउत्पत्ती वाढत असून, संबंधित याकडे दुर्लक्ष करीत आहे. या हलगर्जीपणामुळे शहरातील डेंगू रुग्णाची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या आरोग्य यंत्रणेवर होत असून, पर्यायी रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात बेड, औषध उपलब्ध होत नाहीत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात औषधाचा देखील तुटवडा भासत आहे. खूप गंभीर बाब असून, पाण्याची साठवणूक करून योग्य ती काळजी न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्यावर योग ती कडक कारवाई करावी.
शहरातील डेंगू बाधित रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेची परीस्थितीचे व आजाराचे गांभीर्य पाहता यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. शहरातील डेंगू या आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच विविध आस्थापनांची तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे सूचित करावे. डेंगू बाधित रुग्णांवर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार करावेत, अशी मागणी देखील यावेळी काटे यांनी केली आहे.