पिंपरी चिंचवड – शहरातील शाळा-कॉलेजबाहेर पोलिसांनी गस्त वाढवावी आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत मागणी आज प्रसिद्धीपत्राद्वारे करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक शाळा आणि कॉलेजबाहेरील भाग अनेक टवाळखोरांचा अड्डा बनले आहेत. या ठिकाणी अनेक विद्यार्थिनींना जाताना येताना छेडछाडीचे प्रसंग अनेक वेळा घडत असतात. त्यांच्याकडे विक्षिप्तपणे बघणे, त्यांच्यावर गाड्यांचा रुबाब दाखविणे तसेच भांडण, मारामाऱ्या हे प्रकार सर्रास शाळा आणि कॉलेजबाहेर घडत असल्याचे अनेक पालकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत.
तसेच, शहरात विनयभंग आणि बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून याला कुठेतरी आळा घालणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे. शासनाने त्वरित यावर मार्ग न काढल्यास दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत दुर्गा सुरक्षा पथक निर्मिती करण्यात येणार असून शहरातील शाळा आणि कॉलेज जवळ संरक्षणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी जनजागृती अभियान घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, प्रत्येक शाळेमध्ये मुलींच्या स्वसंरक्षणार्थ एक तास आठवड्यातून शाळेने दिल्यास संघटनेतर्फे मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल, असे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले