भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्यावर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत असून आज ( दि. २ ) त्याला अतिदक्षता विभागातून ( आयसीयू ) खासगी वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऋषभ पंत याच्या कारला शुक्रवारी ( दि. ३० ) पहाटे भीषण अपघात झाला होता. त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ( DDCA) संचालक श्याम शर्मा यांनी स्पष्ट केले होते की, ऋषभ पंतवरील उपचाराबाबत देशातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. सध्या तरी त्याच्यावर डेहराडून येथेच उपचार होणार आहेत. या वेळी श्याम शर्मा म्हणाले होते की, “ऋषभ पंतचा अपघात हा त्याला झोप लागल्यामुळे झाला नाही तर रस्त्यावर असणारा खड्डा चुकवत असताना ऋषभ पंतचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला.”