पिंपरी :- पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीची आठवण सांगितली. मी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी अर्ज भरून फोन बंद करायला सांगितले होते. त्यानंतर जगताप निवडून आले, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली. त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची आज (दि.५) सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
राजकीय जीवनात १९९१ साली माझा आणि पिंपरी चिंचवड शहराचा संबंध आला. त्यावेळी अनेक तरुण कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी खासदार होतो. त्यामुळे तरुणांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड परिसरात चांगले काम कसे करता येईल आणि या शहराला पुणे शहराच्या बरोबरीने कसे आणता येईल, असा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असायचा. या सहकाऱ्यांमध्ये लक्ष्मण जगताप हेदेखील होते, असे अजित पवार म्हणाले.
नगरपालिका, महाालिकेतील नगरसेवक पद, स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद अशी वेगवेगळी पदं आम्ही लक्ष्मण जगताप यांच्याकडे सोपवली. त्यांनी ही जबाबदारी मजबुतीने पेलली. मात्र नंतरच्या काळात काही राजकीय समीकरणं बदलली. २०१४ साली राजकीय स्थित्यंतरं घडली. यातूनच लक्ष्मण जगताप यांनी वेगळा निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सांगितले.