पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील हवा प्रदूषित म्हणून ओळखली जाते. या प्रदूषणाचा फुप्फुसावर नेमका कसा परिणाम होतो, या अभ्यासासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कृत्रिम फुप्फुस उभारले आहे. यातून मानवी फुप्फुसावर या प्रदूषणाचा कसा आणि किती परिणाम होतो, याचा अंदाज घेता येणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ५) करण्यात आले. या कृत्रिम फुप्फुसात प्रदूषणाचे कण जातील. त्याचा परिणाम फुप्फुसावर पडणार आहे. हा परिणाम किती आणि कसा होईल, याचा अभ्यास यातून केला जाणार आहे. महापालिका व परिसर संस्था यांच्या वतीने हा उपक्रम सुरू केला. शहरात कारखाने आहेत. श्वसनाचे आजार वाढले आहेत. हवेतून प्रदूषित कण मानवी फुप्फुसात जातात. वायुप्रदूषणाची गंभीरता नागरिक, प्रशासनाला कळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती परिसर संस्थेच्या श्वेता वर्णेकर यांनी दिली.
पहिल्याच क्षणाला ८१ ची नोंद..
प्रकल्प लोकार्पण होताच ० ते ५० आवश्यक असलेला वायुप्रदूषण निर्देशांकाची ८१ ची नोंद झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला. यापुढच्या काळात ही कृत्रिम फुप्फुसे काळी पडून वायुप्रदूषण निर्देशांक गंभीर स्थितीत पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नागरिकांना गंभीरता कळावी..
शहरात वायुप्रदूषण मोजणीसाठी कृत्रिम फुप्फुसांची उभारणी करण्यात आली आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहराचीही नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील हवेची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. शहरातील वायुप्रदूषणाची गंभीरता नागरिक, प्रशासनाला कळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी बोलताना सांगितले.