पिंपरी : महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत 45 वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (दि. 18) पिंपरीतील एचए स्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. महामंडळाचे सरकार्यवाहक शिवाजी खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय धुमाळ, कार्याध्यक्ष सुकदेव कंद, कोषाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, हवेली तालुकाध्यक्ष विनोद गोरे आदी यावेळी उपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता होणार असून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीन वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, खासदार संजय काकडे, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, आमदार अनिल भोसले, बाळा भेगडे, अॅड. गौतम चाबुकस्वार, दत्तात्रय भरणे, माजी आमदार दिलीप मोहिते, बापुसाहेब पठारे, शिक्षक आमदार विक्रम काळे, रामनाथ मोते, कपील पाटील, ना. गो. गाणार, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, निरंजन डावखरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राहणार आहेत.
अधिवेशनातील मांडण्यात येणारे प्रमुख ठराव 1) शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल जसाच्या तसा मंजूर करुन शिक्षकेतरांच्या भरतीस त्वरीत परवानगी मिळावी. 2) राज्य शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे माध्यमिक शाळेतील शिक्षकेतरांना 12 व 24 वर्षा नंतर पहिला व दुसरा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा. 3) शिक्षकेतरांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना तात्काळ मान्यता देण्यात यावी. 4) शिक्षकेतरांनी सेवेत असताना आपली शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यास सर्व प्रकारच्या पदावर वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा. 5) महाराष्ट्र विधान परिषदेतील शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावा. 6) माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 7) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी प्रत्यक्ष होणारा खर्च तथा धुलाई भत्ता नियमित वेतनातून मिळावा. 8) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा लागू करावी. 9) न्यायालयीन निर्णयानुसार पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. 10) विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांच्या वेतन व वेतन श्रेणीस संरक्षण मिळावे. 11) विनाअनुदानित तुकडीवरील विद्यार्थी संख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावी. 12) सरेंडर रजेचा लाभ पूर्वीप्रमाणे सुरु करण्यात यावा. 13) माध्यमिक शाळेतील लिपीकांना मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे. 14) नोकरीत शिक्षकेतरांच्या पाल्यांना राखीव जागा असाव्यात. 15) चतुर्थश्रेणी सेवकांचे कामाचे स्वरुप निश्चीत करण्यात यावे. 16) माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय परीक्षा मंडळावर शिक्षकेतरांना विभागवार प्रतिनिधित्व मिळावे. 17) प्रत्येक शाळेस रात्रीचा स्वतंत्र पहारेकरी मंजूर करावा व मुलींच्या शाळेत महिला सेविका नेमण्यास यावी. 18) उच्च माध्यमिक साठी स्वतंत्र लिपीकासह इतर शिक्षकेतर कर्मचारी देण्यात यावे. 19) शिक्षकेतरांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात.