पिंपरी – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये विकासाची गंगा आणली. त्यामुळे परिसराचा कायापालट झाला. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितिन काळजे यांनी येथे केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ च-होली गावात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काळजे बोलत होते. या बैठकीत भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, माजी नगरसेवक घनशाम खेडकर, किसन महाराज तापकीर, संत तुकाराम साखर कारखान्याचे चेअरमन अरुण काळजे, पंचायत समितीचे माजी सभापती सर्जेराव दादा तापकीर, शहाजी पांडुरंग तापकीर, लक्ष्मण अण्णा तापकीर, सुनील तापकीर, प्रदीप तापकीर, सावळराम बुर्डे, सुरेश तापकीर, प्रिती तापकीर, कुणाल तापकरी, शांताराम आप्पा तापकीर, राघु तात्या पठारे, नंदूशेठ दाभाडे आदी उपस्थित होते.
माजी महापौर काळजे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील च-होली, मोशी, चिखली, तळवडे, दिघी ही गावे महापालिकेत समाविष्ट होऊन तब्बल दोन दशके उलटली. मात्र, जेवढ्या प्रमाणात ग्रामस्थांनी कर भरला त्याप्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध न झाल्याने हा भाग विकासापासून वंचित राहिला. आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांच्या विकासासाठी स्वप्न पाहिले. व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी भोसरी व्हीजन 2020 च्या माध्यमातून पावले टाकायलाही सुरुवात केली. च-होली गावामध्ये विकास आराखड्यातील रस्ते झाले नव्हते. मुलभूत सोईसुविधांपासून गाव वंचित होते. आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून विकास आराखड्याप्रमाणे रस्त्यांचे जाळे निर्माण केले गेले. भक्ती शक्ती निगडी ते वाघोली व्हाया च-होली तसेच पिंपरी चिंचवड ते पुणे – नगर हायवे व्हाया च-होली या भागात रस्त्यांची कामे करण्यात आली. च-होलीत करण्यात आलेल्या रस्ते सुधारणा, भुमिगत वीज वाहिन्या, मैला शुध्दीकरण प्रकल्प टप्पा क्रमाक दोन, जलतरण तलाव टप्पा दोन, इंद्रायणी सुधार प्रकल्प या मुळे परिसराचे नंदनवन झाले आहे. क्रिडांगणाचे काम चालू आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1 हजार 442 घरांची निर्मिती करण्यात येत आहे. च-होली मध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने आज पिंपरी चिंचवडमध्ये गृह प्रकल्प उभारणीत च-होली अग्रस्थानी आहे, असे काळजे म्हणाले.
देहू आळंदी तीर्थक्षेत्रांच्या परिसरात वाहणा-या इंद्रायणी नदीची अवस्था बिकट झाली होती. भोसरी व्हिजन 2020 अभियानाच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी सर्वे केला. त्यात भराव टाकलेले ठिकाणे, पात्रालगतची गॅरेज, हॉटेल व बांधकांमाची माहिती संकलीत केली. थेट नदी पात्रात मिसळणारे सांडपाणी, नाल्यांची माहिती घेतली, निळी व लाल पूररेषा विचारात घेऊन इंद्रायणी नदी विकासाचा संकल्प केला. असे सांगून माजी महापौर काळजे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या संवर्धनासाठी ‘नमामी गंगा’ हा नदी सुधार प्रकल्प हाती घेतला. याच धर्तीवर आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महापालिकेने इंद्रायणी नदीच्या संवर्धन व विकासासाठी एच.सी.पी. डीझाईन, प्लॅनिंग ॲण्ड मॅनेजमेंट या अहमदाबाद सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे. अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रंन्ट प्रकल्पाचे काम या संस्थेने केले आहे. या संस्थेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भोसरी मतदार संघात समाविष्ट गावांमध्ये पर्यावरण रक्षणास हातभार लागणार असल्याचे काळजे म्हणाले.