पिंपरी चिंचवड ः वाल्हेकरवाडी, चिंतामणी चौक परिसरात 26 जानेवारी 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त श्री. बिष्णोई, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भाजपा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष शंकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिवले, प्रदीप नेहते, राहुल पाचपांडे, बिभीषण चौधरी यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. महिलांचे संरक्षण, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी या परिसरात गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक नामदेव ढाके यांनी पोलीस चौकीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार पत्र व्यवहार आणि पाठपुरावा केला होता. याची स्वतः पोलीस आयुक्त श्री. बिष्णोई यांनी दखल घेत रविवार दि. 26 जानेवारी रोजी चिंचवड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या पोलीस चौकीचे उद्घाटन केले. या भागात नवीन पोलीस चौकी उभारण्यात आल्याने नागरिकांकडून समाधानकारक भूमिका व्यक्त होत आहे.
उद्घाटनानंतर श्री. बिष्णोई म्हणाले, शहरातील गुन्हेगारी नामशेष करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहे. आवश्यक त्या भागांमध्ये पोलीस चौकीच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम सूरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, शहरातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली आहे. आयुक्तालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या
संरक्षणाचे काम पोलीस करीत आहेत. स्थानिक नगरसेवक नामदेव ढाके यांनी वाल्हेकरवाडी परिसरात पोलीस चौकीची मागणी केली होती. त्याला पोलीस आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्वरित पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले, शहरात वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता या परिसरात गुन्हेगारीचे वाढू नये, यासाठी पोलीस चौकीची मागणी करण्यात आली होती. पोलीस चौकी स्थापन झाल्यामुळे महिलांच्या सोनसाखळ्या चोर्या, रात्री अपरात्री गुंडांचे वाद अशा घटनांना आळा घालण्यास मदत होणार आहे. तसेच विवाहितांना होणार्या त्रासाचे निवारण करण्याकरीता अत्यावश्यक असलेली चौकी सूरू झाल्याचा आनंद आहे.