Chaupher News

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर हे खेळांसाठीच्या सुविधांचे देशातील प्रमुख केंद्र आहे. मुलांना खेळांसाठीचे योग्य शिक्षण देणे हे काळाची गरज आहे, असे मत अरिमया व्हेंचर या स्टार्टअप कंपनीचे संस्थापक सिद्धार्थ देशमुख यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ऑटोक्लस्टर, चिंचवड येथे दि. २८ व दि. २९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवल ऑफ फ्युचर या महोत्सवामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना व युवकांना फ्युचर ऑफ हेल्थ अॅंड फिटनेस या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते.यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत आदी उपस्थित होते.

अरिमया व्हेंचरचे सिद्धार्थ देशमुख म्हणाले, जी स्वप्न तुम्हाला झोपेत दिसतात त्यांनी तुम्ही काहीही करू शकत नाही तर जी स्वप्न तुम्हाला झोपू देत नाहीत तीच तुम्हाला घडायला मदत करतात. चांगल्या आरोग्यासाठी कोणताही खेळ खेळणे आवश्यक असते. जीवनात कधीच हार मानायची नाही हि शिकवण खेळ आपल्याला देतो. आज देशातील खेळांच्या विविध लीग्सच्या माध्यमातून खेळांचे व्यावसायकिकरण होत असून युवकांसाठी या माध्यमातून भविष्यामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असेही ते म्हणाले.

GOQii या फिटनेस अॅपचे संस्थापक विशाल गोंडल म्हणाले, या महोत्सवाचे आयोजन करणे हि कल्पनाच नाविन्यपूर्ण आहे. आज आपली आरोग्य सेवा पूर्णपणे कोसळली असून त्याला आरोग्य सेवेपेक्षा आजारीसेवा म्हणणे जास्त योग्य ठरेल. आरोग्य क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जिथे प्रचंड स्पर्धा असून देखील उपचारांच्या किंमती फार जास्त आहेत. देशातील ९७% नागरिकांचा आपल्यावर उपचार करणा-या डॉक्टरवर विश्वास नाही पण अभिनेते, अनेक बाबा, विविध शेफ यांच्यावर जास्त विश्वास आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आरोग्य विषयक मिळणारी माहिती धोकादायक आहे.

FITTR या फिटनेस स्टार्टअपचे संस्थापक जितेंद्र चौकसी म्हणाले, माझा फिटनेस पाहून मित्रांनी मला फिटनेससाठी मार्गदर्शन करण्यास सांगितले. यातून सुरुवातीला मी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली व नंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी फिटनेसवर पुस्तक लिहिले. परंतु लोकांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याची मागणी सुरु केल्याने त्यांना मोफत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली व हळूहळू याच क्षेत्राला माझे करिअर म्हणून निवडले. अनेक लोकं करतायत म्हणून एखादी गोष्ट आपण करणे हे योग्य नाही. लोकांमध्ये फिटनेस फॅशन म्हणून प्रसिद्ध होत असून निरोगी भविष्यासाठी हि चांगली गोष्ट आहे असेही ते म्हणाले.

प्रसादिती या संस्थेचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी म्हणाले, पोलिओ झालेल्या मुलांसाठी हालचाल करायला मदत करणारे कृत्रिम अवयव तयार करण्याच्या इच्छेतून या संस्थेची निर्मिती केली. परंतु यासाठी भांडवल उभे करणे ही मुख्य अडचण माझ्यासमोर होती. परंतु सरकारच्या मदतीने हि अडचण दूर झाली. आज संस्थेच्या माध्यमातून विविध कृत्रिम अवयव तयार करत असून ग्रामीण भागातील शाळकरी मुलांमध्ये विज्ञानाविषयी जागृती देखील करण्याचे काम करीत आहे. कोणत्याही स्टार्टअपचा मुख्य उद्देश हा लोकांच्या अडचणी सोडवणे हा असला पाहिजे व असे स्टार्टअप लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. केवळ कुतूहलातूनच नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण होऊ शकतात असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here