पिंपरी : अवघ्या तीन महिन्यावर आलेल्या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगातर्फे जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे 600 कर्मच्याऱ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रभागनिहाय मतदार याद्या बनविण्यासाठी 250 गट नेमले गेले. याविषयी माहिती देताना निवडणूक विभागाचे अधिकारी यशवंत माने म्हणाले की, प्रशिक्षणात कर्मच्याऱ्यांना यावेळी राज्य निवडणूक विभागाने तयार केलेल्या टू वोटर ‘अॅप’ ची माहिती दिली, त्या अॅपच्या मदतीने कंट्रोल चार्ट कसा निर्माण करतात याची माहिती देण्यात आली. कंट्रोल चार्टमध्ये नवीन 32 प्रभागानुसार विधानसभेच्या मतदारांची विभागणी करुन नवीन यादी म्हणजे कंट्रोल चार्ट तयार केला जाईल. त्यासाठी 250 गट तयार केले असून त्यामध्ये लिपीक व स्थापत्य सहाय्यक असे दोन सदस्य असतील. या 250 गटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 25 कार्यालयीन अधीक्षक नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच त्या 25 नियंत्रण अधिकार्यांवर 5 प्रशासन अधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. या अनुक्रमे प्रत्येकाला टू वोटर अॅप डाऊनलोड करुन दिले, त्यानुसार त्यांना येत्या 10 ते 11 दिवसात मतदार कंट्रोल चार्ट बनविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी टू वोटर अॅपचा वापर कसा व काशासाठी करावा, याची माहिती दिली, तसेच त्यांची कामाची पद्धत समजवून सांगण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यांना मतदार याद्या, निवडणूक साहित्य, नकाशे यांचेही वाटप करण्यात आले.