पिंपरी : मुलगी दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यास महापालिकेच्या वतीने 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते. तर अशी योजना राबविणारी राज्यातील प्रथम महापालिका आहे. या योजनेचा गेल्या 5 वर्षात 11 दाम्पत्यांनी लाभ घेतला आहे. तर पहिल्या व दुसऱ्या मुलीवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना लाभ योजनेत 324 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गंत मुलगी दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यास महापालिकेच्या वतीने 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते. तसेच पहिल्या व दुसऱ्या मुलीवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना लाभ अशा योजना राबविल्या जातात, या योजना राबविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका मानली जाते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेअंर्तगत विविध 19 योजना राबविण्यात येतात. यामध्ये पहिल्या मुलीवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास महापालिकेच्या वतीने तब्बल 25 हजार रूपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते. तर पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यानंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास 10 हजार रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते. ही योजना 2012 पासून सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 324 महिलांनी लाभ घेतला आहे. त्यासाठी 36 लाख 5 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर 2016-17 या चालू आर्थिक वर्षांत या योजनेसाठी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मुलगी दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यास लाभ देण्याच्या योजनेसाठी शहरातील रहिवासी पुरावा, दत्तक विधानाबाबत न्यायालयीन आदेशाची प्रत, आधार कार्ड, बँक पासबुकची सत्यप्रत तर मुलीचा जन्मदाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक असून मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया योजनेच्या लाभासाठी शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, शहरातील रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, मिळकत कर पावती आदी रहिवाशी पुरावा, आई व मुलींचे आधारकार्ड, मुलींचा जन्मदाखला, एक किंवा दोन मुली असल्याबाबत प्रतिज्ञा पत्र, अर्जदाराचे बँक पासबुकची सत्यपत्र असणे आवश्यक आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.