प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मानवंदना
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या पूजन करून मानवंदना देण्यात आली. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांच्यासह वैभव सोनवणे आणि श्रावण अहिरे यांनी पूजनविधी पार पाडला. शाळेचे शिक्षक जय बागले यांनी बुद्ध वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
भार्गवी ठाकरे (8वी), अनया पानपाटील (5वी), आराध्या अहिरे (6वी), हेतांशी पवार (7वी) आणि सिद्धी देसले (7वी) या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे दिली. विद्यार्थ्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. शाळेत आणि महाविद्यालयात अस्पृश्यतेचा सामना करावा लागूनही त्यांनी शिक्षण घेतले आणि यशस्वी वकील बनले. उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या अत्याचारापासून दलित समाजाला वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला. 1924 मध्ये “बहिष्कृत हितकारणी सभा” स्थापन करून शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि संघटन यावर त्यांनी भर दिला. 1927 मध्ये महाड येथे चवदार तळे सत्याग्रह आणि 1935 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह यांच्यासारख्या अनेक चळवळी त्यांनी उभ्या केल्या.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार बनले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिव्यक्ती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार सूर्यवंशी यांनी केले. भूपेंद्र साळुंखे यांनी फलक लेखन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग आणि इतर कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या शिकवणी आणि कार्याचा समाजावर होणारा प्रभाव अधोरेखित करण्यात कार्यक्रम यशस्वी ठरला.