‘पुन्हा ते मित्र, पुन्हा ती मजा… प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात
पिंपळनेर : ‘पुन्हा ते मित्र, पुन्हा ती मजा… पुन्हा तो शाळेत मिळणारा आनंद’ विद्यार्थ्यांचा किलबिलाट, विद्यार्थ्यांची उत्सुकता, काही नवीन चेहऱ्यांच्या मनात भरलेली धडकी, शिक्षकांना भेटण्याची घाई, पालकांची गर्दी अशा उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात पिंपळनेर प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या आवारामध्ये लावलेली कार्टून हिरोंची मोठ-मोठी कट-आउट्स…. पालकांना सूचना करण्यासाठी रंगबेरंगी खडूंनी रंगविलेले फळे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काढलेल्या तितक्याच आकर्षक रांगोळ्या… अशा सर्वच बाबींकडे अगदी नवलाईने पाहत, ‘हे काहीतरी वेगळंच दिसतंय,’ असे नजरेनेच ताडत शाळेमध्ये ‘एन्ट्री’ घेणारे बालक- पालक आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी तत्परता दाखविणारे शालेय शिक्षक!
शुक्रवारी शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. पहिला दिवस असल्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होता. शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील शिक्षकांनी ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुलांचे औक्षण करून त्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. जुने मित्र भेटल्यावर अनेक मुले खूष दिसत होते. बसमध्ये देखील अनेक मुलांनी धमाल मस्ती केली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या शालेय प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपणच सेलिब्रेटी असल्याचा एक अनोखा फील देत होते. ढोल- ताशांच्या गजरात होत असलेली सरस्वतीची आरती किंवा आवडत्या बालगीतांच्या तालासोबत विद्यार्थ्यांही ठेका धरून डुलत होते. रडक्या दोस्त मंडळींना डोरेमॉन- छोटा भीम दाखवून ‘रडू नकोस ना,’ असं सांगण्यातही ही दोस्तमंडळी मागे नव्हती. अशा सर्वच गोष्टींमधून ‘हे सगळं आपलंच आहे,’ अशी एक आगळीवेगळी भावना हे छोटे दोस्त एकमेकांशी शेअर करत असल्याचे शाळांमधून अनुभवायला मिळाले.