
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन आदरणीय प्रशांत पाटील साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन प्रचिती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका सरिता खैरनार मॅडम यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. देशभक्तीचा जयघोष, तिरंग्याची पताका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रंगतदार सादरीकरणामुळे संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला. सकाळच्या ताज्या गारव्यात शाळेच्या प्रांगणात देशभक्तीपर गाणी, आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी वातावरण भरून गेले होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर आणि मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला.
शिस्तबद्ध व आकर्षक मार्चपास
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी श्री सैनिक अशोक रामदास देसले यांचे औक्षण करून आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यापासून झाली. आणि यानंतर सुनिता जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिस्तबद्ध व आकर्षक मार्चपास हा सोहळ्याचा पहिला खास आकर्षण ठरला.नर्सरी ते चौथीपर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील महान नेत्यांचे रूप धारण करून सर्वांचे मन जिंकले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. तिरंगा उंचावताच ‘भारतमाता की जय’, ‘जय जवान जय किसान’ आणि ‘वंदे मातरम्’ चा जयघोष परिसरात घुमला. राष्ट्रगीताच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या भावनेने भारले. त्यानंतर महाराष्ट्राची ओळख सांगणारे हृदयाला स्पर्श करणारे “महाराष्ट्र गीत”, ध्वजगीत विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात सादर केले. पुढे झालेल्या सामूहिक पी.टी. व्यायामात विद्यार्थ्यांनी शिस्त, स्वास्थ्य आणि एकत्रित प्रयत्नांची जिवंत झलक साकारली.
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांनी सर्व उपस्थितांचे मन जिंकले. या सादरीकरणांमधून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील शौर्यकथा, स्वातंत्र्य सेनानींचे त्याग आणि आजच्या पिढीची जबाबदारी यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.

यानंतर अर्चना देसले मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती सांगितली. शाळेच्या प्राचार्य अनिता पाटील मॅडम यांचे प्रेरणादायी विचार, शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर यांचे उत्साहवर्धक शब्द आणि प्रमुख पाहुण्यांच्या प्रभावी भाषणाने कार्यक्रमाला विचारमंथनाची गती मिळाली. व त्यांनी आपले मनोगत पुढील प्रमाणे मांडले.मी माजी सैनिक श्री अशोक रामदास देसले मी 2003 मध्ये भरती झालो आणि ट्रेनिंग साठी मी पुणे कीरखी इथे 2 वर्ष ट्रेनिंग केली ट्रेनिंग संपल्यावर माझी 1 ली पोस्टिंग फिरोजपूर पंजाब इथे झाली 2007 मध्ये परत तिथून माझी 2 री पोस्टिंग 2007 ते 2009 राजोरी जम्मू आणि काश्मीर मध्ये झाली परत काही दिवस मी नग्रोता जम्मू इथे ड्युटी केली. परत 3 री पोस्टिंग माझी 2010 ते 2014 गुजरात अहमदाबाद इथे झाली.परत माझी4 थी पोस्टिंग 2014 ते 2017 जम्मू आणि काश्मीर ला झाली. काही दिवस चंडीगढ पंजाब मध्ये पण ड्युटी दिली व काही दिवस वेलिगतोन तामिनाडूमध्ये पण ड्युटी भेटली आणि माझी शेवटची पोस्टिंग 2017 ते फेब्रुवारी 2020 पंजाब अमृतसर वाघा बॉर्डर इथे झाली आणि फायनली मी 14 दिवस संपूर्ण देश सेवा करून मी माझ्या माय देशी सुखरूप घरी परत आलो.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अश्विनी मॅडम यांनी केले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मयुरी सोनार मॅडम आणि वैशाली जगताप मॅडम यांनी चौथीतील विद्यार्थ्यांना घेऊन सादर केलेल्या रंगतदार नृत्यप्रस्तुतीला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. तर सायली पवार मॅडम यांनी सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना घेऊन तयार केलेल्या पिरॅमिड प्रदर्शनाने एकता, सहकार्य आणि शारीरिक क्षमतेचे सुंदर दर्शन घडवले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी सायली मॅडम,शितल मॅडम आणि वैशाली जगताप मॅडम यांनी काढली. स्वातंत्र्य दिनाचे फलक लेखन प्रेरणा मॅडम आणि प्रतीक्षा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे फोटो वैशाली वाघ मॅडम आणि व्हिडिओ जागृती बिरारीस मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची बातमी दिव्या जाधव मॅडम यांनी लिहिण्याची जबाबदारी घेतली.
कार्यक्रमाच्या समारोपाला आभारप्रदर्शन शितल शिंपी मॅडम यांनी केले व प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यात विद्यार्थ्यांच्या तिरंगा रंगातील चित्रकला, हस्तकला आणि शैक्षणिक प्रकल्पांचे आकर्षक सादरीकरण झाले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स व बिस्किट्सचे वाटप करण्यात आले.
या भव्य सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली, तर उपस्थित पालक, शिक्षक व मान्यवरांना हा दिवस अविस्मरणीय ठरला.


















