प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर दीपावली मोठ्या उत्साहात साजरी
गरिब व गरजू लोकांमध्ये फराळ वाटप कार्यक्रम

पिंपळनेर : आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली साजरी मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली. संपूर्ण शाळा रंगीत दिव्यांनी, फुलांनी आणि रांगोळीने सजविण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये अपार आनंद आणि उत्सुकता दिसत होती. आजच्या कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन आदरणीय शाळेचे संस्थापक माननीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांच्या नियोजनात करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन जागृती बिरारीस व प्रतीक्षा अहिरे मॅम यांनी केले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनी वैष्णवी भामरे व प्रांजल सूर्यवंशी यांनी केले. शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली सण मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी वसुबारस, धनत्रयोदशी, अभ्यंगस्नान, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बळीप्रतिपदा आणि भाऊबीज हे सर्व सण एकत्रितपणे साजरे करण्यात आले.
सकाळपासूनच शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण होते. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि वर्गांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. रंग, फुले आणि दिव्यांनी सजविलेल्या या रांगोळ्यांनी शाळेचे वातावरण अधिकच सुंदर बनवले. यासोबतच फलक लेखनही करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने झाली. आजच्या दिवशी शाळेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत भीमराव पाटील तसेच शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम व शाळेच्या सर्व शिक्षिका यांनी गाई वासरांचे पूजन करून मातृत्वाचा सन्मान केला. धनत्रयोदशी निमित्त आरोग्य व समृद्धीचा संदेश देणारे भाषण सादर केले. यानंतर अभ्यंगस्नानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
नरक चतुर्थीच्या दिवशी अभंग स्नानाचे महत्त्व असते त्यासाठी एलकेजी चा विद्यार्थी अर्ष खैरनार व एलकेजीच्या शिक्षिका यांनी देखावा सादर केला, त्यानंतर लक्ष्मीपूजनाचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. सर्वांनी देवी लक्ष्मीची आरती केली आणि ज्ञान, सत्य आणि प्रामाणिकतेचे पूजन करण्याचा संकल्प केला. यानंतर “बळीप्रतिपदा” साजरी करण्यात आली ज्यात विद्यार्थ्यांनी “राजा बळी आणि भगवान विष्णू” यांची कथा सादर करून दानशीलतेचा संदेश दिला. भाऊबीज कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपल्या भावांना तिलक लावले आणि भावबंध दृढ केला. त्यानंतर इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांनी दीपावलीवरील नृत्य सादर केले. व इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी राम आयेंगे असे गीत सादर केले.
कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना “अंध:कारातून प्रकाशाकडे” आणि “एकतेचा व आनंदाचा सण” असा सुंदर संदेश दिला. 14 वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम लक्ष्मण सीता अयोध्येत परत आले होते आणि त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आमच्या शाळेचे विद्यार्थि आज राम अंशू कदम आणि सीता आरुषी निकम आणि जानवी शिंदे हनुमान सिद्धार्थ हसानि लक्ष्मी चैतन्य शिंदे यांच्या वेशभूषेत आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतर्फे गरिब आणि गरजू लोकांमध्ये फराळ वाटप, कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम राबवताना शाळेचे माननीय श्री. प्रशांत भीमराव पाटील व शाळेचे समन्वयक श्री. राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला. सर्वांनी आनंदाने आणि प्रेमाने वाटप केले, ज्यामुळे समाजात सेवा आणि दानाची भावना दृढ झाली.
आजच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांचा विशेष सहभाग लाभला आजच्या या धकाधकीच्या जीवनात गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांचा विशेष सहभाग नोंदवला गेला. यानंतर मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “दीपावली म्हणजे फक्त दिव्यांचा सण नसून ती आपल्यातील अंध:कार दूर करून ज्ञान, प्रेम आणि दयाळूपणाचा प्रकाश पसरविण्याची प्रेरणा देते.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेत सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर यांनीही भाषणात सांगितले की, “आजच्या पिढीने शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारी ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.” संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. शेवटी सर्व शिक्षक व विद्यार्थी मिळून फटाके न फोडता पर्यावरणपूरक पद्धतीने दीपावली साजरी केली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांनी नेहा साबळे यांनी केले.















